22.5 C
Latur
Sunday, October 20, 2024
Homeमहाराष्ट्रएसटीत पहिली अशोक लेलँडची बस दाखल

एसटीत पहिली अशोक लेलँडची बस दाखल

पुणे : प्रतिनिधी
एसटी महामंडळात स्वमालकीच्या अशोक लेलँड कंपनीच्या बस दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. पहिली अशोक लेलँडच्या बांधणीची बस दापोडीत दाखल झाली आहे. अशा एकूण २,४३० बसेस महामंडळाला मिळणार आहेत. एसटीत दिवाळी सणापर्यंत ३०० गाड्या दाखल होण्याची शक्यता आहे. या बसेस आरामदायी आसनांच्या असून त्या स्वमालकीच्या असल्याने महामंडळाचा मोठा फायदा होणार आहे. एसटी महामंडळाने नुकताच अशोक लेलँड कंपनीसोबत बस खरेदीचा करार केलेला आहे.

एसटी महामंडळाकडे पूर्वी १८ हजार बसेसचा ताफा होता. परंतु गेली अनेक वर्षे नवीन बस खरेदी रखडली आहे. त्यामुळे एसटी महामंडळात जुन्या बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या एसटी महामंडळाकडे १६ हजार बसेस आहेत. नवीन बसेस २ बाय २ आसनी असून डिझेलवर धावणा-या आहेत.

त्यामुळे एसटी महामंडळाला लांबपल्ल्याच्या मार्गावर या बस चालविणे शक्य होणार आहे. एसटी महामंडळाकडे इलेक्ट्रिक बसेस देखील हळूहळू समाविष्ट होत आहेत. तसेच एलएनजीवर धावणा-या बसेस देखील तयार करण्यात येत आहेत. एसटी महामंडळाने साल २०२३ रोजी झालेल्या ३०३ व्या बैठकीत महामंडळाच्या एकूण पाच हजार डिझेल इंधनावर चालणा-या बसेसचे लिक्विफाईड नॅचरल गॅस या पर्यायी इंधनावर चालणा-या बसमध्ये रुपांतरण करण्याची योजना आखली आहे.

दापोडीत पहिली बस दाखल
दापोडी कार्यशाळेत एसटीची पहिली अशोक लेलँडने बांधलेली बस आली आहे. या बसचे रजिस्ट्रेशन दापोडीतच होणार आहे. या बसेस लांबीला मोठ्या आकाराच्या आहेत. त्यामुळे परिवर्तन बसेसप्रमाणे जादा प्रवाशांना सामावून घेता येणार आहे. दिवाळीपर्यंत अशोक लेलँडच्या ३०० गाड्या महामंडळाला मिळतील असे म्हटले जात आहे. या ऑगस्ट महिन्यात एसटी महामंडळाला नऊ वर्षांनंतर प्रथमच ऑगस्ट २०२४ मध्ये १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये फायदा झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR