मुंबई : प्रतिनिधी
इतर वाहनांपेक्षा एसटी बसच्या अपघाताची संख्या अत्यंत कमी आहे. तरीही एसटी महामंडळाने अलिकडे सोशल मीडियावर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन एसटी महामंडळातील सर्व वाहक आणि चालकांची ब्रेथ एनालायझर टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्रेथ एनालायझर चाचणीत शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण नेमके किती आहे याची इत्यंभूत माहिती मिळत असते. त्यामुळे एसटी चालक आणि वाहकांवर जणू संक्रातच आलेली आहे.
एसटी महामंडळातील कर्मचा-यांची संख्या ८० हजाराच्या आसपास आहे. यात सर्वाधिक संख्या अर्थात वाहक आणि चालकांचीच आहे. या एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या चालक आणि वाहकांना आता ब्रेथ एनालायझरच्या चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. एसटीच्या ताफ्यात सध्या १६ हजार गाड्या असून त्यावर चालक आणि वाहकांची कामगिरी असते.
या सर्व वाहक आणि चालकांची ब्रेथ एनालायझर टेस्ट घेण्यासाठी महामंडळाने खास पथकच नेमले आहे. या तपासणी पथकात सुरक्षा खात्यातील पर्यवेक्षक, मार्ग तपासणी पथकातील पर्यवेक्षक, प्रशिक्षण पर्यवेक्षक याचा समावेश करण्यात आला आहे.
एसटी महामंडळाने एक परिपत्रक जारी केले आहे. १६ ते २० जानेवारी २०२५ या कालावधीत विभागातील मद्यप्राशन करणा-या संशयित चालक आणि वाहक यांच्या यादीप्रमाणे सर्व चालक आणि वाहकांची तपासणी विशेष पथके नेमुन करण्यात यावी असे एसटी महामंडळाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
रजेवर असलेल्या किंवा गैरहजर असलेल्या चालक आणि वाहक यांना वगळता इतर सर्व संशयित चालक आणि वाहकांची तपासणी करण्यात यावी असे सक्त आदेश देण्यात आले आहेत. तपासणी न झालेल्या चालक आणि वाहकांची तपासणी न होण्याची कारणे देखील नमुद करण्यात यावी असेही या परिपत्रकात म्हटले आहे. या व्यतिरिक्त बसस्थानक, कंट्रोल पॉईंटवरील वाहतूक नियंत्रकांमार्फत लॉग शिट नोंद करताना इतर सर्व चालक वाहकांची तपासणी करण्यात येणार आहे.