29.5 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeमहाराष्ट्रएसटीला ३० कोटींचा फटका

एसटीला ३० कोटींचा फटका

मुंबई : आर्थिक आणीबाणीच्या काळात सरकारी अधिका-यांमुळे एसटीला तब्बल तीस कोटी रुपयांचा फटका बसत असल्याचा आरोप महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

दरम्यान, एसटीचा तोटा वाढतोय म्हणून एकीकडे भाडेवाढ करण्यात आली असताना दुसरीकडे मात्र उत्पन्नाचा स्रोत असलेल्या एसटीच्या अनेक वाणिज्य आस्थापना म्हणजेच दुकान गाळे, हॉटेल गाळे, पान टप-या मुदत संपूनही घुसखोरांच्या ताब्यात असून त्यांना बाहेर काढण्याचा अधिकार हा निवासी उपजिल्हाधिका-यांचा आहे . पण त्यांनी आस्थापना धारकांशी हातमिळवणी करून वेळीच कारवाई न केल्याने आर्थिक आणीबाणीच्या काळात एसटीला तब्बल तीस कोटी रुपयांचा फटका बसत असल्याचा आरोप श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

एसटीच्या स्व मालकीच्या बांधीव व मोकळ्या जागेतील ३५०० वाणिज्य आस्थापना म्हणजेच दुकान गाळे, हॉटेल गाळे व विविध वस्तू भांडार असून त्याचा मुख्य उद्देश प्रवाशांना मूलभूत सोयी देणे असतानाही, त्यातील तब्बल ६७७ गाळे हे विविध कारणांनी वर्षानुवर्षे भाडे तत्त्वावर देण्यात आलेले नाहीत. एकूण २०८१ गाळे प्रत्यक्ष कार्यरत असून त्यापैकी १८८० गाळ्यांचे नियमित भाडे येत आहे.

२०१ गाळे रिकामे
२०१ गाळे रिकामे असून काही गाळे मुदत संपून सुद्धा गाळेधारकांनी सोडलेले नाहीत. त्यामुळे साधारण ३० कोटी रुपये बुडाले आहेत व त्याचे पुढे नियमानुसार भाडेसुद्धा ते देत नाहीत. याशिवाय अजून काही आस्थापनाधारक हे न्यायालयात गेले असून वर्षानुवर्षे अशी प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे साधारण ४४ कोटी रुपये इतके उत्पन्न बुडाले आहे. न्यायालयीन प्रक्रियेत अडचणी आहेत.

एसटीचे अधिकारी भाडेवसुली करण्यास हतबल
मुदत संपूनही वेळेवर गाळे रिकामे न करणा-या घुसखोरांना बाहेर काढण्याचा निष्कासनाचा अधिकार निष्कासन अधिनियम १९५५ नुसार हा त्या-त्या जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिका-यांच्या कक्षेत येत असल्याने एसटीचे अधिकारी भाडेवसुली करण्यास हतबल ठरले आहेत. घुसखोरांना बाहेर काढण्यास निवासी उपजिल्हाधिका-यांकडून कुचराई होत असल्याचे निदर्शनास आले असून त्यात भ्रष्टाचार होत असल्याचेही निदर्शनास येत असल्याचे बरगे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR