बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्य परिवहन मंडळाच्या बसने एका महिलेला चिरडले आहे. महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मंगळवारी (२ सप्टेंबर) सकाळी ही घटना घडली.
मृत महिलेचेनाव विजयमाला नानाभाऊ सरवदे (वय- ५५ वर्षे) असे असून त्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेली माहिती अशी, की केज येथील मूळ रहिवासी असलेल्या विजयमाल सरवदे या गेल्या ३५ वर्षांपासून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाता कार्यरत होत्या. विजयमाला या मंगळवारी सकाळी ६ वाजात ड्युटीवर जात असताना ही घटना घडली. विजयमाला धारूर -परळी बसने (क्रमांक एमएच १५ एमएच २३४७) अंबाजोगाईला जायला निघाल्या होत्या.
सकाळी सात वाजेच्या सुमारास त्या अंबाजोगाई येथील मोरेवाडी पाण्याच्या टाकीजवळ बसमधून उतरत होत्या. त्याचवेळी बस चालकाने अंदाज न घेता बस पुढे नेली. विजयमाला सरवदे या बसच्या मागच्या चाकाखाली सापडल्या. या अपघातात गंभीर जखमी अवस्थेत विजयमाला यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेने विजयमाला यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.