चाकूर : प्रतिनिधी
लातूर-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील नांदगावपाटी (ता. चाकूर) येथे मोटारसायकलस्वाराला वाचविण्यात भरधाव वेगातील एसटी पलटी झाल्यामुळे बस मधील जवळपास ३७ जण जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी १.४० वाजता घडली आहे. जखमी पैकी ६ प्रवाशी यांना गंभीर दुखापत झाली असून जखमींवर लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उपचार केले जात आहेत.
अतनुर ते लातूर ही बस चाकूर येथून प्रवाशी घेऊन लातूरच्या दिशेने निघाली असता नांदगावपाटी जवळ एक मोटारसायकलस्वार अचनाकपणे उजव्या बाजूला वळत असल्याचे लक्षात येताच पाठीमागून येणा-या एम. एच. २० बी. एल. १६१३ क्रमांकाच्या बस चालकाने मोटारसायकलस्वाराला वाचविण्यासाठी एसटी बाजूला घेण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्यामुळे बस दुभाजकाला घडकून विरूध्द बाजूला पलटी झाली.
अपघातातील जखमींना तात्काळ उपचार व मदत पुरवा : आ. अमित देशमुख
सोमवारी दुपारी अहमदपूर – लातूर या एसटी बसला आष्टामोड जवळील नांदगाव पाटी नजीक भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच आपदग्रस्तांना सर्वतोपरी तात्काळ मदत करण्यासंबंधी व त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याच्या सूचना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व इतर संबंधितांना दिल्या.