शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा… पाठीवरती हात ठेवून फक्त तुम्ही लढ म्हणा ! या आशयाच्या कवितेच्या ओळी शेतक-यांना संकटकाळी उभारी देत असतात. मात्र भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने शेतक-यांचा धरलेला पिछा सुटता सुटत नसल्याने शेतक-यासह सर्वसामान्य नागरिक अवकाळी पावसाने मेटाकुटीला आला आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने शेतक-यासह व्यापारी व नागरिकांची तारांबळ उडाली आहे. या अवकाळी पावसाने पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतक-यांची कामे खोळंबली असून भर उन्हाळ्यात नदीनाल्यांना आलेला पुराबरोबरच सर्वसामान्यांची कंबर मोडली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यात आठवड्याच्या सुरवातीपासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. यामुळे शेतक-यांची झोप उडाली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागांत बेमोसमी पावसाने वादळी वा-यासह जोरदार हजेरी लावली. या पावसाने भर उन्हाळ्यात नदी, नाल्यांना पूर आल्याने नदी नाले खळाळून वाहत असल्याचे बघायला मिळाले. यासोबतच सध्या सर्वत्र लग्न सोहळ्याची तिथी मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी लग्न सोहळ्यावर अवकाळीे पावसाने पाणी फिरविल्यामुळे अनेकांना घाईघाईने लग्नसभारंभ उरकावे लागले असून यामुळे व-हाडीवर्गाची मोठ्या प्रमाणावर तारांबळ उडाली होती.