मुंबई : प्रतिनिधी
महायुती सरकारने निवडणुका जिंकण्यासाठी भरमसाठ घोषणा केल्या. फुकटचा निधी वाटण्याचे काम करून तिजोरी रिकामी केली. आता एसटीच्या कर्मचा-यांना पगार द्यायला त्यांच्याकडे निधी नाही. ऐपत नसताना योजना दिल्या कशाला? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केला आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांच्या पगारात तब्बल ५६ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे ई-कॅबिनेटसाठी मंत्र्यांना आयपॅड देण्यात येणार आहे. यावरून राज्य शासनाच्या निर्णयावर टीका होत आहे. कर्मचा-यांच्या पगार कपातीवरून विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले.
मंत्रिमंडळासाठी ई-कॅबिनेट प्रणाली लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याकरिता प्रत्येक मंत्र्याला आयपॅड दिला जाणार आहे. यावर एक कोटी सोळा लाख रुपये खर्च केला जाणार आहे. मंत्रालयाचे कामकाज अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केले जात आहे ही चांगली बाब आहे. ती कामाची गरजसुद्धा आहे. यावर फार खर्च होत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.
आयपॅडवर खर्च करत असताना एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांच्या पगारात कपात करणे, त्यांचे वेतन रोखणे योग्य नसल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये धावणा-या ७० ते ८० टक्के गाड्या नॉन एसी आहेत. उन्हाळ्यात त्या बसमध्ये बसू शकत नाही. पण चालक व वाहक चटके सहन करून सेवा देतात. एसटी कर्मचा-यांची पगार कपात करणे म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळणे आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.