37.7 C
Latur
Monday, March 31, 2025
Homeअंतरराष्ट्रीयऑक्सफर्ड विद्यापीठात ममता बॅनर्जींच्या भाषणावेळी गोंधळ

ऑक्सफर्ड विद्यापीठात ममता बॅनर्जींच्या भाषणावेळी गोंधळ

लंडन : वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लंडनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या केलॉग कॉलेजमध्ये भाषण दिले. यावेळी त्यांच्या भाषणादरम्यान काही विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. या विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत आरजी कर कॉलेज आणि घोटाळ्यांशी संबंधित मुद्दे उपस्थित केले. मात्र, मुख्यमंत्री ममता यांनी परिस्थिती सांभाळत निदर्शकांना उत्तर दिले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना या महाविद्यालयात महिला, मुले आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या सामाजिक विकासावर बोलण्यासाठी बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांनी बंगालमधील ‘स्वास्थ्य साथी’ आणि ‘कन्याश्री’ योजनांचाही संदर्भ दिला. यानंतर, त्यांनी बंगालमधील गुंतवणुकीवर बोलायला सुरुवात करताच, काही लोक हातात फलक घेऊन उभे राहिले. यावर, राज्यातील निवडणुका आणि हिंसाचार तसेच आरजी करचा मुद्दा होता. यावेळी निदर्शकांनी घोषणाबाजीही केली. यावर, मुख्यमंत्र्यांनी मोजक्या शब्दांत उत्तर देत निदर्शकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

निदर्शने करणा-यांना उत्तर देताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, माझा अपमान करून आपल्या संस्थेचा अपमान करू नका. मी देशाची प्रतिनिधी म्हणून आली आहे. आपल्या देशाचा अपमान करू नका. यानंतर, कार्यक्रमाचे आयोजक आणि तेथे उपस्थित लोक निदर्शकांविरोधात उभे राहिले आणि त्यांना तेथून जाण्यास भाग पाडले.

आरजी कर प्रकरणावर काय म्हणाल्या ममता?
निदर्शकांनी उपस्थित केलेल्या आरजी कराच्या मुद्द्याला प्रत्युत्तर देताना ममता म्हणाल्या, थोडे मोठ्याने बोला, मला तुमचे बोलणे ऐकू येत नाही. मी आपले सर्व म्हणणे ऐकेन. हे प्रकरण प्रलंबित आहे, हे आपल्याला माहीत आहे का? या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी आता केंद्र सरकारची आहे. हे प्रकरण आता आमच्या हातात नाही. येथे राजकारण करू नका, हे राजकारणाचे व्यासपीठ नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR