नागपूर : प्रतिनिधी
महायुती सरकारसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा आहे. पात्र महिलांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसेही जमा झाले आहेत. दरम्यान, काही महिलांचे अर्ज विविध कारणांमुळे रखडले होते. त्यांचे अर्ज भरण्यासाठी सरकारने सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या अनेक महिलांना अद्याप या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. ते पैसे आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे
दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरून राज्यातील राजकारण देखील चांगलेच तापले आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे.
अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पैसे कधी मिळणार याबाबतची माहिती दिली आहे. नागपूमध्ये बांधकाम कामगार मेळाव्यात बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, वर्षाला अकरा हजार रुपये म्हणजेच महिन्याला दीड हजार रुपये लाडक्या बहिणींना देत आहोत. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे या (सप्टेंबर) महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देऊ. तसेच, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येही पैसे देऊ असे ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी त्यांनी काँग्रेसने या योजनेला विरोध केला तरीही आम्ही योजना लागू केल्याचे सांगितले. ते म्हणाले, या योजनेविरोधात काँग्रेस कोर्टात गेले पण आम्ही कोर्टात सांगितले की, या योजनेसाठी आम्ही बजेटमध्ये पैसा ठेवलेला आहे. आधीच्या योजनांना स्थगिती दिलेली नाही, काँग्रेसने कितीही विरोध केला तरीही या योजना बंद होणार नाहीत, हा शब्द मी देतो, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.