लातूर : एजाज शेख
महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील ऑटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ निर्माण केले. जे आदर्श ऑटोरिक्षा चालक आहेत त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे. पाच वर्षांपुर्वीची नोंदणी असलेले ६५ वर्षांच्या वरील जे काही ऑटोरिक्षा चालक आहेत त्यांना १० हजार रुपयांचे पुरस्कार या मंडळाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. लातूर जिल्ह्यात आजघडीला ८ हजार ७०० ऑटोरिक्षा आहेत. परंतु, वास्तविक पाहता जिल्ह्यात ६५ वर्षांवरील ऑटो रिक्षाचालकांची संख्या किती?, हा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे राज्याचे कल्याणकारी मंडळाने नेमके कोणाचे ‘कल्याण’ होणार, अशी चर्चा ऑटोरिक्षाचालकांमध्येच आहे.
राज्य शासनाने प्रारंभीच कल्याणकारी मंडळासाठी ऑफलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरु केली तेव्हाच ऑटोरिक्षाचालकांच्या मनात या कल्याणकारी मंडळाविषयी शंका निर्माण झाली होती. नोंदणीच करावयाची होती तर ऑफलाईनच का?, ऑनलाईन का नाही?. त्यामुळे ऑटोरिक्षाचालकांमध्ये एका प्रकारची अनास्था निर्माण झाल्याने ऑटोरिक्षाचालकांनी शंभर टक्के नोंदणी केलीच नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्रासपणे ऑटोरिक्षाचालकाचे वय २० ते ३० वर्षे वयोगटातील सर्वाधिक आहे. शिक्षण झाले, नोकरी नाही, नोकरी लागेपर्यंत बेकार राहण्यापेक्षा ऑटोरिक्षा चालविणा-यांची संख्या या वयोगटातील सर्वाधिक आहे. जास्तीत जास्त ३० ते ३५ वर्षे वयानंतर ऑटोरिक्षा चालविणारे खुप कमी चालक आहेत.
तिशी ओलांडल्यानंतर ऑटोरिक्षाचालविणे बंद करुन इतर व्यवसायाकडे वळणा-यांची संख्याही खुप मोठी आहे. त्यामुळे ६५ वर्षांपर्यंत ऑटोरिक्षा चालविणारा ऑटोचालक मिळणेच मुळात दुरापास्त असल्यामुळे राज्य शासनाच्या या योजनेचे नेमके होणार काय?, असा प्रश्न निर्माण होतो आहे. लातूर जिल्ह्यात ऑटोरिक्षाांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागील पाच वर्षांत ३ हजार १९८ नवीन ऑटोरिक्षा रस्त्यांवर आल्या आहेत.
कोरोनामुळे शहरी भागातील रोजगार गमावून गावाकडे आलेल्या तरुणांनी कमी भांडवलात तत्काळ रोजगार उपलब्ध करुन देणारा व्यवसाय म्हणून प्रवासी ऑटोरिक्षाकडे वळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ऑटोरिक्षांची संख्या झपाट्याने वाढत गेली. लातूर जिल्ह्यात नोंदणीकृत ऑटोरिक्षांची संख्या ८ हजार ७०० आहे.
त्यापैकी ८० टक्के ऑटोरिक्षा या लातूर शहरात असल्याचे सांगण्यात आले.