25.7 C
Latur
Thursday, May 8, 2025
Homeमहाराष्ट्र‘ऑपरेशन सिंदूर’चा धसका

‘ऑपरेशन सिंदूर’चा धसका

मसूद अझहरच्या मदरशावर भारताचा प्रचंड हल्ला, पाकिस्तानी मीडिया हादरली

नवी दिल्ली : भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर अचूक आणि निर्णायक प्रहार केला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील (पीओके) ९ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले, ज्यामध्ये कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचा बहावलपूर येथील मदरसा पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. या कारवाईने दहशतवाद्यांच्या मनात भीती निर्माण केली असून, पाकिस्तानमधील माध्यमे आणि नागरिकही हादरले आहेत.

मध्यरात्री सुरू झालेली धडक कारवाई
मंगळवार आणि बुधवारी रात्री १.३० वाजता, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. अत्यंत गुप्तपणे आणि अचूक नियोजनासह झालेल्या या कारवाईत भारतीय वायुदल आणि आर्मीने बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथील दहशतवादी अड्ड्यांवर एकाच वेळी क्षेपणास्त्रे डागली. या कारवाईतील सर्वांत मोठा हल्ला बहावलपूरमध्ये झाला, जिथे जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याचा मदरसा लक्ष्य करण्यात आला. चार क्षेपणास्त्रे या इमारतीवर डागण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात ज्वाळा भडकल्या आणि मदरसा जमीनदोस्त झाला.

हल्ल्यानंतर, पाकिस्तानमधील एका स्थानिक टीव्ही चॅनेलने या घटनेची पुष्टी करताना सांगितले की, ‘‘शोले भड़क उठे, आसमां लाल-लाल’’ अशी दृश्ये या परिसरात पाहायला मिळाली. पाकिस्तानी लष्कर आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या, मात्र मदरसा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे त्यांच्या प्रतिनिधींनीही कबूल केले आहे.

या हल्ल्यात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याचेही समोर आले आहे. परिसरातील रस्ते बंद करण्यात आले असून, वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. हल्ल्यानंतर बहावलपूरमधील अन्य मदरसे रिकामे करण्यात आले असून, रस्त्यावर नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

मौलाना मसूद अझहर, दहशतवादाचा चेहरा
मसूद अझहर हा बंदी घातलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. २०१९ मधील पुलवामा हल्ला, ज्यात ४० भारतीय जवान शहीद झाले, त्यामागे याच संघटनेचा हात होता. त्याचप्रमाणे पठाणकोट एअरबेसवर झालेल्या हल्ल्यातही मसूद अझहरचाच सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सचे आयसी-८१४ विमान अपहरण करून कंधारला नेण्यात आले होते. त्या वेळी तीन दहशतवाद्यांच्या सुटकेच्या अटीवर हा मसूद अझहर भारत सरकारला सोडावा लागला होता. त्यानंतर तो पाकिस्तानात परतला आणि दहशतवादी कारवायांची मालिका सुरू झाली.

जागतिक दहशतवादी घोषित
२०१९ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी मसूद अझहरला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित केले. भारताने त्याच्यावर बंदी घालण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न केले होते. पाकिस्तान सरकार त्याला संरक्षण देत होते, मात्र आंतरराष्ट्रीय दबावामुळे अखेर त्याला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR