नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्ताननेही सीमेवर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले. दरम्यान, या काळात भारतावर १५ लाख सायबर हल्ले झाल्याचे समोर आले.
हे सायबर हल्ले भारताच्या मजबूत सायबर सुरक्षा यंत्रणेने हाणून पाडले. फक्त १५० सायबर हल्ले थांबवता आले नाहीत. हे हल्ले पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मोरोक्को आणि पश्चिम आशियातून करण्यात आले. भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी युद्धविराम असूनही, पाकिस्तानमधील हॅकर्स भारत सरकारच्या वेबसाइटना लक्ष्य करत आहेत. बांगलादेश आणि पश्चिम आशियातूनही सायबर हल्ले झाले. महाराष्ट्र सायबर अधिका-यांनी सोमवारी ही माहिती दिली.
पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, मोरोक्को आणि पश्चिम आशियाई देशांमधून हे हल्ले सुरूच आहेत. महाराष्ट्र सायबर कार्यालयाने इंटरनेट माध्यमांवरील बनावट माहितीविरुद्ध मोहीम सुरू केली आहे आणि ८३ पैकी ३८ बनावट बातम्यांच्या पोस्ट काढून टाकल्या आहेत.
ऑनलाइन फसवणुकीबद्दल जागरूकेसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिक तात्काळ मदतीसाठी १९४५ आणि १९३० वर डायल करू शकतात. सायबर फसवणूक करणा-यांवर वेळेवर कारवाई करून, २०१९ पासून ६०० कोटी रुपये वाचले आहेत. गेल्या सहा महिन्यांत २०० कोटी रुपये वाचले आहेत.