सावरगाव (बीड) : प्रतिनिधी
मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी दाखले दिले जात आहेत. आम्ही कोणाला विरोध केला नाही, ना आम्ही कोणाच्या विरोधात आलो. हा अध्यात्म आणि शिक्षणाशी जोडला गेलेला समाज आहे. परंतु ओबीसी समाजाचा कटऑफ मागास प्रर्वगापेक्षा जास्त असून भविष्यात ओबीसी समाजाला मोठ्य स्पर्धेस सामोरे जावे लागेल. बीडमध्ये सुरु असलेले जातीपातीचे आणि एकमेकांकडे दुषित नजरेने पाहाणे बंद झाले पाहिजे,असे आवाहन गोपीनाथ गडावरील दसरा मेळाव्यातून माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार धनंजय मुंडे यांनी केले.
गोपीनाथ गड येथे गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होतो. यावेळी पंकजा मुंडे यांचा ऊसाची मोळी आणि कोयता देऊन सत्कार करण्यात आला. माजी खासदार प्रितम मुंडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यावेळी उपस्थित होते.
राज्यात सध्या आरक्षणावरुन सुरु असलेल्या राजकारणावर धनंजय मुंडे म्हणाले, काही ठराविक लोकांकडून फक्त स्वत:ला खुर्ची मिळावी यासाठी दोन जातींना लढवले जात आहे. मुंडेंनी कोणाचेही नाव न घेता, मराठवाड्यात उभ्या केल्या जात असल्याचे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षावर भाष्य केले.
मराठा समाजाला आरक्षण दिले. त्याचा आम्हाला आनंद आहे. कारण त्या आरक्षणासाठी आम्ही देखील लढलेलो आहे. मात्र काही लोकांना ओबीसीमधून आरक्षण हवे आहे. मराठा समाजासाठी सरकारला जे काही करायचे आहे, ते सर्व त्यांनी केले आहे. आरक्षण दिले आहे, आणखी दिले तरी आमचे काही म्हणणे नाही. मात्र, एकाच्या ताटातील काढून दुस-याच्या ताटात देण्याचे काम सरकारनेही करु नये, असे आमदार मुंडे म्हणाले.
मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी दाखले दिले जात आहेत. यामुळे मराठा समाजाला आता ओबीसीमधून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. यावर धनंजय मुंडे म्हणाले की, नव्याने दाखले मिळालेल्यांनी समजून घेतले पाहिजे की, नुकत्यात झालेल्या एमपीएससी परीक्षेत ओबीसीचा कटऑफ हा आर्थिक मागास समाजाच्या आरक्षणापेक्षा जास्त आहे. ओबीसीचा कटऑफ ४८५ होता तर आर्थिक मागास प्रवर्गाचा कटऑफ ४५० होता. त्यामुळे आता ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाले आहेत, त्यांना मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे, असा सूचक इशारा मुंडेनी केला.