छ. संभाजीनगर : औरंगजेबाची कबर हटवावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यावरून महाराष्ट्रात राजकारण पेटले. नागपूरमध्ये दंगल देखील झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याने कबरीला संरक्षण असल्याने ती हटवता येणार नसल्याचे सांगितले तसेच कबरीचे उदात्तीकरण होऊ देणार नसल्याचेही ठणकावले. आता ज्या खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे त्या खुलताबादचे नाव बदलू, अशी घोषणा मंत्री संजय शिरसाट यांनी केली.
संजय शिरसाट म्हणाले, औरंगजेबाची कबर असलेले खुलताबादचे नाव रत्नापूर होते. औरंगजेबाने ते बदलून खुलताबाद केले. देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद केले. खुलताबादचे नामांतर होणार असून दौलताबादचे देखील नामांतर होणार आहे.
संभाजीनगरचे नाव खडकी होते. कालांतराने त्याचे नाव औरंगाबाद झाले. तसे खुलताबादचे नाव रत्नापूर होते. कालांतराने ते खुलताबाद झाले. औरंगजेबाने त्याच्या काळात जे काही कारनामे केले आहेत त्यामुळे अनेक शहरांची नावं बदलली. धाराशिवचे नाव बदलले गेले. नगरचे नाव बदलले गेले. हे सगळे ‘बाद’ ‘बाद’ आहे ना त्यांची नावं बदलण्याची प्रोसेस आम्ही करतोय, असे देखील संजय शिरसाट म्हणाले.
शौर्य स्मारक उभारणार
संजय शिरसाट म्हणाले, औरंगजेबाची कबर आहे तेथे मराठ्यांचे शौर्याचे प्रतीक असलेले संभाजी महाराजांचे, शिवाजी महारांजे स्मारक उभारण्यासाठी निवेदने येत आहेत. शिवाजी महाराजांचे आणि संभाजी महाराजांचे स्मारक या ठिकाणी बांधण्यात येईल. औरंगजेबाने नामांतर केलेल्या सगळ्या गावांची नावं बदलणार आहोत, असा निर्धार देखील शिरसाट यांनी बोलून दाखवला.