छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हिंदुत्ववादी संघटनांसह शिवप्रेमींनी याबाबत सातत्याने आवाज उठवला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनीही ही मागणी केली आहे. ‘औरंगजेब राष्ट्रपुरुष होता काय?’असा परखड सवाल उपस्थित करत, त्यामुळे त्याची कबर हटवण्यात यावी, असे त्यांनी ठामपणे म्हटले आहे.
दरम्यान, खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केले की, औरंगजेब हा समाजसेवक नव्हता, त्यामुळे कबरला कोणतेही सामाजिक स्वरूप देता कामा नये. या विषयाला धार्मिक वळण न देता, थडगे हटवले जावे, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी यापूर्वीच ही मागणी केली होती, मात्र आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारानेही हेच मत मांडल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
राज्यात सत्ताबदल झाल्यापासून अहिल्यानगरमधील सुपा एमआयडीसी परिसरात व्यावसायिकांना त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप निलेश लंके यांनी केला आहे. महसूल मंत्री असताना, राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिका-यांमार्फत व्यावसायिकांवर दडपशाही केली. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही चुकीच्या पद्धतीने काही कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात आली,’ असा आरोप त्यांनी केला.