32.8 C
Latur
Sunday, March 23, 2025
Homeमुख्य बातम्याऔरंगजेबाच्या कबरीचा दर्जा काढण्याविषयी याचिका दाखल

औरंगजेबाच्या कबरीचा दर्जा काढण्याविषयी याचिका दाखल

मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीच्या विषयावरुन उलटसुलट वक्तव्य केले जात आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी नागपुरात हिंसाचार झाला होता. आता हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे. औरंगजेबच्या कबरीला दिलेला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाच्या दर्जाबाबत याचिका दाखल झाली आहे. हा दर्जा काढण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये औरंगजेबची कबर आहे. या कबरीला १९५२ मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, काही नागरिक आणि संघटनांनी यावर आक्षेप घेतला आहे. या कबरीला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा देणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

याचिकाकर्त्यांपैकी एक असलेले रतन लथ यांनी सांगितले की, औरंगजेब याच्या कबरीबाबत गरज नसताना वाद निर्माण केला जात आहे. ते म्हणाले, मी हिंदू नाही, पण पारशी आहे. देशप्रेमी आहे. औरंगजेब हा क्रूर होता. त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला. त्या व्यक्तीच्या कबरीला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा देणे चुकीचे आहे. या निर्णयामुळे देशप्रेमी मुस्लिम समाजही अडचणीत आला आहे.

औरंगजेब याने चुकीच्या पद्धतीने राज्य केले. त्याच्यासाठी आपण भांडणे का करायची? तो आपला बादशहा नव्हता, मुळात तो आपला नव्हताच. त्याचा जन्म भारतात झाला असेल, तरी देशासाठी त्याने काहीही केले नाही. त्याचा इतिहास बघितला तर एकही चांगली गोष्ट त्याने केलेली नाही, असे रतन लथ यांनी म्हटले.

औरंगजेबच्या कबरीला विशेष दर्जा असल्यामुळे सध्या ही कबर काढणे शक्य नाही. मात्र हा दर्जा हटवल्यास महापालिका बुलडोझर लावून ती काढू शकते, असे सांगत लथ म्हणाले, उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा असा दर्जा द्याल का? दरम्यान, या याचिकेवर न्यायालय काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष दर्जा हटवण्याची मागणी मान्य झाल्यास पुढील कारवाई कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR