29.4 C
Latur
Tuesday, April 15, 2025
Homeमहाराष्ट्रऔरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा दिला

औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा दिला

संजय राऊत यांचा अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप

मुंबई : प्रतिनिधी
रायगडावर अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रवचन दिले. पण तिथे महायुतीतला एकोपा दिसला नाही. एसंशिं गटाचे लोक स्नेहभोजनाला नव्हते. रायगडावर जे भाषण अमित शहा यांनी केले त्यावर इतकेच सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आम्हाला अमित शहा यांच्याकडून शिकावं लागणं इतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार काय होता? त्यांची भूमिका काय होती? महाराष्ट्राने काय केलं पाहिजे वगैरे वगैरे हे औरंगजेबाप्रमाणे सूडाने कारवाया करणारे आम्हाला ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले छत्रपतींचे वंशज आणि जय जय करणारे लोक माना डोलवणार इतकी वाईट वेळ राज्यावर आलेली नाही. गेले तीन महिने यांचेच लोक औरंगजेबाचे थडगे उखडून टाकण्याच्या विचारांनी भारावून गेले होते.

आम्ही औरंगजेबाचं थडगं किंवा कबर म्हणतो, औरंगजेबाची कबर उखडून टाकावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘छावा’ चित्रपटाचे शो ठेवले होते. पण आम्ही ज्याला थडगे म्हणतो त्या औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख देशाच्या गृहमंत्र्यांनी समाधी असा केला. औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी समाधीचा दर्जा दिला. रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीने समाधीचा दर्जा दिला यापेक्षा महाराष्ट्रात वाईट काय घडणार? मग इतक्या हाणामा-या, दंगली कशाला घडवल्या? औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला त्याचा हा परिणाम आहे का? त्यामुळे औरंगजेबाविषयी इतकं प्रेम गुजरातच्या नेत्यांना आहे. हिंदुत्वाच्या शत्रूला समाधीचा दर्जा देण्याचे वक्तव्य अमित शहा यांनी केले. छत्रपतींचे वंशज हे बाजूला बसलेले होते. त्यांना या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला हवा होता असेही संजय राऊत म्हणाले.

महाराजांचे ढोंगी चाहते रायगडावर होते
छत्रपती शिवाजी महाराजांचे ढोंगी चाहते म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना औरंगजेबाची समाधी या शब्दावर आक्षेप घ्यावासा वाटला नाही. औरंगजेबाची समाधी हा शब्द दुस-या कुणी काढला असता तर वर जे त्रिकूट होतं ना त्यातल्या दोघांनी थयथयाट केला असता. समाधी म्हणतात, औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात वगैरे म्हटलं आहे. मात्र अमित शहा यांच्याबाबत मुख्यमंत्री काहीच म्हणाले नाहीत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

महाराजांचा एकेरी उल्लेख
अमित शहा यांचे भाषण नीट ऐका. त्यांनी शिवाजी महाराज हा उल्लेखच केला नाही उलट शिवाजी, बालशिवाजी, शिवाजी असे करत महाराजांचा एकेरी उल्लेख केला असाही आरोप संजय राऊत यांनी केला. छत्रपतींचा अपमान करणारे हे कुठले ज्ञानदेव? आमच्या महाराष्ट्रात ज्ञानदेव आहेत. शिवाजी महाराजांचा अपमान गृहमंत्र्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी खटला दाखल केला पाहिजे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR