औसा : प्रतिनिधी
औसा येथील बसस्थानकाने सुविधेत मराठवाड्यात प्रथम तर राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. स्वच्छ व सुंदर बसस्थानक म्हणून स्तरावर येथील बसस्थानकाने नावलौकिक मिळवला असून यामुळे औसेकरांसह आमदार अभिमन्यू पवार यांची मान उंचावली आहे.
गेल्या सहा वर्षांपासून आ. अभिमन्यू पवार औसा मतदारसंघात विकासाची गंगा आणत आहेत. अनेक विकासाच्या योजना औसा विधानसभा मतदारसंघात राबवित विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहे. पुढील २५ वर्षांचे व्हिजन ठेवत मतदारसंघात अनेक विकासकामे केली जात आहेत. त्यात आरोग्य, रस्ते, नागरी सुविधा, अनेक शासकीय कार्यालय त्याचबरोबर ग्रामीण भागातील पाणंद रस्ते याचा समावेश आहे.
मतदारसंघातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी या उद्देशाने औसा शहरात नवीन बसस्थानकाची उभारणी करण्यात आली. या नवीन बसस्थानकाची रचना व आखणी योग्य केल्याने औसेकरांच्या समस्या मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. नुसत्या इमारती न बांधता त्या इमारतीची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या औसा डेपोने बसस्थानक स्वच्छ व सुंदर ठेऊन राज्यासमोर आदर्श निमाण केला, त्यामुळेच औसा बसस्थानकाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत राज्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात, अ वर्गवारीतील आपले औसा बसस्थानक मराठवाड्यातील पहिले आणि राज्यातील दूसरे सर्वात स्वच्छ व सुंदर बसस्थानक ठरले आहे. त्यामुळे निश्चीतच औसेकरांसहीत आ. अभिमन्यू पवार यांची मान उंचावली आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत राज्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात, ‘अ’ वर्गवारीतील औसा बसस्थानक मराठवाड्यातील पहिले आणि राज्यातील दुसरे सर्वात स्वच्छ व सुंदर बसस्थानक ठरले आहे. यासोबतच लामजना बसस्थानक ‘क’ वर्गवारीतील बसस्थानकांमध्ये मराठवाड्यातील तिसरे सर्वात स्वच्छ व सुंदर बसस्थानक ठरले आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा करून औसा, लामजना आणि कासारसिरसी येथे बसस्थानक बांधकामासाठी निधी मंजूर करून आणला, सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून, बांधकाम पूर्ण करून तिन्ही बसस्थानके कार्यान्वित केली. ही बसस्थानके औसेकरांना दर्जेदार सेवा देण्यासोबतच स्वच्छतेच्या बाबतीतही अव्वल ठरली आहेत.