नवी दिल्ली : अभिनेत्री, भाजपच्या हिमाचलमधील खासदार कंगना राणावत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कंगना राणावत यांची खासदारकी रद्द करण्यासंदर्भात हिमाचल हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी कोर्टाने कंगना यांना नोटीस पाठवत त्यांचे उत्तर मागवले आहे.
कंगना यांना कोर्टाने उत्तर सादर करण्यासाठी २१ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या लायक राम नेगी यांनी कंगनाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.
सरकारी कर्मचारी नेगी यांनी निवडणूक लढण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांना ते विजयी होती
असा आत्मविश्वास होता. मात्र, निवडणूक अधिका-यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द केला. त्यामुळे कंगना राणावत यांची निवड रद्द करावी आणि पुन्हा निवडणूक घ्यावी, अशी मागणी नेगी यांनी केली आहे. नेगी यांनी आरोप केला आहे की, स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी सर्व कागदपत्रे तयार केली होती. त्यांच्या सरकारी निवासस्थानाच्या वापरातील नो ड्यूजचे प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांना उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर दुस-या दिवशीची वेळ देण्यात आली होती. त्यांनी नो ड्यूजचे प्रमाणपत्र सादर केले. मात्र ते अधिका-यांनी न स्वीकारता त्यांचा उमेदवारी अर्ज बाद केल्याचा आक्षेप याचिकेद्वारे नेगी यांनी घेतला आहे.