निटूर : प्रतिनिधी
निटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊन मुलास घेऊन गावाकडे जात असताना शेतमालकांच्या दुचाकीस कंटनेरने पाठीमागून जोराची धडक दिल्याची घटना निटूरजवळील पेट्रोलपंपाजवळ येथे घडली. या आपघातामध्ये ९ वर्षीय मुलाचा आणि शेतमालक सुधाकर कवठकर यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील बाकली येथील किरण सुभाष कांबळे (वय ३७) हे सुधाकर कवठकर (वय ६५ रा. माचरटवाडी ता. निलंगा) यांच्याकडे सालगडी म्हणून काम करीत होते. किरण कांबळे यांचा ९ वर्षीय मुलगा यश किरण कांबळे हा आजारी असल्याने तो निटूर (ता. निलंगा) येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल होता. शुक्रवारी मुलाला रुग्णालयातून सुट्टी मिळाल्याने किरण कांबळे हे आपले मालक सुधाकर कवठकर यांना दुचाकीवर सोबत घेऊन निटूरला आले होते.
आरोग्यवर्धिनी केंद्रातून आपल्या मुलाला घेऊन ते गावाकडे परतत असताना निटूरजवळील पेट्रोलपंपाजवळ भरधाव कंटेनर (टी.एस. ०७ एल ०१६६) ने पाठीमागून जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचे दोन तुकडे तर झालेच शिवाय दुचाकीस्वार १० फूट उडून रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात पडला. या अपघातामध्ये ९ वर्षीय यश किरण कांबळे याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेले सुधाकर कवठकर यांचा पाय मोडल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांनाही गंभीर मार लागल्याने उपचारा दरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. तर किरण कांबळे यांचाही हात फ्रैक्चर झाला असून त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
दुचाकीला उडवून कंटेनर भरधाव वेगाने शिरूर अनंतपाळ कडे जात असल्याचे कळाल्यानंतर माचरटवाडी येथील ग्रामस्थ रमेश लांबोटे यांनी पुढील गावातील काही मित्रांना फोन करून सदर वाहनास आडवायला सांगितले.
कंटनेर सय्यद अंकुलगा येथे आल्यानंतर स्थानिकांनी अडवला आणि चालकास पकडले. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास बीट जमादार सुधीर शिंदे व कैलास शिंदे हे करीत आहेत.