लातूर : प्रतिनिधी
महावितरण प्रशासनाने वारंवार सूचना देवूनही वीज यंत्रणेजवळ कचरा टाकण्याचे व तो जाळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या दहा दिवसात रोहित्रा जवळ कचरा जाळल्याने रोहित्र जळून वीजपुरवठा खंडीत होण्याबरोबरच लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. शहरातील अनेक भागात नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. मोकळ्या जागी, मुख्य रस्त्याच्या कडेला तसेच वीजपुरवठा करणा-या रोहित्रांच्या जवळील कचरा जाळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रोहित्राला आग लागण्याच्या घटना घडत आहेत. मागील आठवडयात सावेवाडी येथील रोहित्रास कचरा जाळल्यामुळे आग लागल्याने वीजपुरवठा खंडीत होण्याबरोबर लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.