21.3 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरकचरा पेटला, गेला एका कर्मचा-याचा जीव

कचरा पेटला, गेला एका कर्मचा-याचा जीव

लातूर : प्रतिनिधी
आग लागलेला कचरा विझवताना लातूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडीवरील चालकाचा -हदयविकाराने मृत्यू झाल्याची -हदयविदारक घटना दि. ३ मार्च रोजी घडली. कचरा पेटवून देण्याची खोड एखाद्याचा जीव घेऊ शकते हे या घटनेवरुन समोर असले असून आता तरी नागरीकांनी कचरा पेटवून देऊ नये, अशी -हदय पिळवटून टाकणारी विनंती अग्निशमन दलाकडून करण्यात आली आहे.

शहरात कचरा जाळण्याच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कचरा जाळणे कायदेशीर गुन्हा असला तरी लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाकडून कचरा जाळणा-यांवर कसलीही कारवाई होत नसल्यामुळे सर्रासपणे कचरा जाळला जात आहे. शहराच्या रिंग रोडवर दररोजच कचरा जळत असतो. शहरातील मध्यवर्ती, गजबजलेल्या ठिकाणीही कचरा जाळला जातो. व्यापारीपेठेचे चित्र तर धक्कादायक आहे. व्यापारी दिवसभर आपापला व्यवसाय करतात. रात्री दुकान बंद करुन घरी जाण्याअगोदर दुकानातील सर्व कचरा बाहेर काढला जातो. तो कचरा दूकानासमोरच एकत्र करुन पेटवून व्यापारी घरी निघून जातात. कचरा रात्रभर जळत असतो. वा-यामुळे जळता कचरा इतरस्त्र पसरुन मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही कचरा जाळला जातो.

रविवारी सायंकाळी ४.५५ ते ५६ वाजण्याच्या सुमारास शहराच्या गावभागातील खडक हनुमान चौक परिसरातील रामगल्लीजवळ मोकळ्या पटांगणातील कच–याला आग लागली. आगी जवळच वीजेच्या डीपीही आहे. ही माहिती लातूर शहर महानगरपालिकच्या महात्मा गांधी चौकातील अग्निशमन दलाच्या कार्यालयाला मिळाली. अग्निशमन दलाच्या गाडीवर चालक म्हणून कार्यरत असलेले शेरखॉ महेबुबखॉ पठाण वय ५७ वर्षे यांनी तातडीने अग्निशमन दलाची गाडी काढली. गाडी घटनास्थळी पोहोंचली. सर्वच जवान कच-याला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते. बघ्याची गर्दी होती. चालक शेरखॉ पठाण हे पाणी कमी, जास्त सोडण्याचे ऑपरेटींग करीत असतानाच त्यांना -हदयविकाराचा झटका आला. ते जागेवरच कोसळले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना तत्काळ विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन त्यांना मृत घोषीत केल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी आनंद शिंदे यांनी दिली. कोणीतरी कचरा पेटवून दिल्याने रहिवाशी परिसरात मोठी आग लागली. जवळच वीजेचा डीपी होता. त्यामुळे मोठी दुर्घटना घडू नये म्हणुन अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते. ही आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दालाचे जवान शेरखॉ पठाण यांचे -हदयविकाराने निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर तरी नागरीकांनी कचरा न जाळण्याचे सामाजिक भान ठेवावे, असे आवाहन अग्निशमन दलाच्या जवानांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR