लातूर : प्रतिनिधी
युपीएससी परीक्षेत यश मिळवून देश सेवा करण्याचे स्वप्न अनेकांनी उराशी बाळगलेले आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी अथक परिश्रम, चिकाटी आणि जिद्द अंगी बाळगणे आवश्यक असल्याचे मत डॉ. अक्षय मुंडे यांनी व्यक्त केले. लातूर येथील एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील माजी विद्यार्थी समिती व शैक्षणिक समिती यांच्या वतीने आयोजित ‘नागरी सेवांमधील संधी’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. मुंडे बोलत होते. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड, प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे, उप प्राचार्य डॉ. यतीश कुमार जोशी हे उपस्थित होते. या प्रसंगी युपीएससी परीक्षेतील यशाबद्दल डॉ. अक्षय मुंडे यांचा डॉ. हनुमंत कराड व माजी विद्यार्थी समिती, शैक्षणिक समिती पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
युपीएससी म्हणजे आयुष्य नव्हे तो फक्त आयुष्याचा एक भाग आहे. युपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना अभ्यासासाठी दिलेला वेळ हा तुम्हाला यशापर्यंत घेऊन गेला नाही तरी तुमचे व्यक्तिमत्व घडवतो, असे सांगून डॉ. मुंडे म्हणाले की, मी परळी तालुक्यातील पांगरी या खेडेगावातील शेतकरी कुटुंबातून आहे. माझ्या लहान वयातच वडिलांचे छत्र हरवले असून माझे शिक्षण व पालनाची पूर्ण जबाबदारी आईनेच पेलली आहे. पुणे येथे युपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी असल्याने सातत्याने अभ्यासाची सवय येथे कामी आली आणि जास्तीत जास्त वेळ मला अभ्यासासाठी देता आला. युपीएससी पूर्व परीक्षा प्रश्न पत्रिकांचा अभ्यास, योग्य स्टडी मटेरियल, मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने लेखन सराव, परीक्षा पद्धतीचे अवलोकन आणि मुलाखतीची तयारी अशा पद्धतीने अभ्यासाचे नियोजन केले. अभ्यासाबरोबर मानसिक, शारीरिक आरोग्याची काळजी घेतली. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीसाठी विशेष तयारी केली. देहबोली, वर्तन, संवाद कौशल्य, हजर जबाबीपणा, विषयाचे सखोल ज्ञान अशा पद्धतीने तयारी करून मुलाखतीला सामोरे गेलो आणि माझे युपीएससीचे स्वप्न साकार झाले, असे ते म्हणाले.
यावेळी डॉ. कराड म्हणाले की, अक्षय मुंडे यांनी कोणतेही मार्गदर्शन नसताना युपीएससी सारख्या परीक्षेत स्वयं अध्ययन करून यश मिळवणे हे कौतुकास्पद असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. स्पर्धा परीक्षेसाठी कक्षे बाहेरील विचार, समग्र आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रणोती चिंचणसुरे यांनी केले तर आभार डॉ. पुनम नागरगोजे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शैक्षणिक समिती अध्यक्ष डॉ. गौरी उगिले, माजी विद्यार्थी समिती प्रमुख डॉ. पुनम नागरगोजे, सदस्या डॉ. रोहिणी दिवेकर, डॉ. तृप्ती गिरी, डॉ. प्रणोती चिंचनसुरे यांच्यासह एमआयटी शिक्षण संकुलातील प्राध्यापक, डॉक्टर व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.