संभाजीनगर : प्रतिनिधी
शासकीय आदिवासी विभागाच्या वसतिगृहात राहणा-या शेकडो विद्यार्थ्यांनी कालपासून आंदोलन छेडले आहे. गारखेडा परिसरातील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयासमोर शेकडो विद्यार्थ्यांचे सलग दुस-या दिवशी शनिवारी दिवसभर धरणे आंदोलन सुरू होते. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला. वरिष्ठ अधिका-यांनी मंत्र्यांशी बोलणे करुन दिल्यानंतरही विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले नाही.
शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातील डी.बी.टी. रक्कमेत वाढ करण्यात यावी किंवा पूर्वीप्रमाणे वसतिगृहात भोजन व्यवस्था करण्यात यावी, पंडित दिनदयाल योजनेच्या डी.बी.टी. रक्कमेत वाढ करावी, शासकीय आदिवासी मुला, मुलींच्या वसतिगृहातील प्रवेश क्षमता वाढविण्यात यावी, पोस्टमॅट्रीक शिष्यवृत्ती मागील दोन ते तीन वर्षापासून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही. ही शिष्यवृत्ती तातडीने द्यावी, तसेच यापुढे शैक्षणिक वर्ष सुरू होताच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम द्यावी, आदी मागण्यांसाठी आदिवासी मुला-मुलींनी विविध मागण्यासाठी आंदोलन छेडले आहे.
शेकडो विद्यार्थ्यांनी गारखेडा परिसरातील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय येथे धरणे धरले आहे. कडाक्याची थंडी असूनही विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे न घेताच रात्री मुक्कामही या कार्यालयाबाहेर केला.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यासंदर्भात येणा-या अधिवेशनात आर्थिक तरतूद करण्याचे आश्वासन आदिवासी विभागाच्या मंत्र्यांनी आंदोलकांना फोनवरुन दिले. मात्र आदिवासी विकास आयुक्त अथवा प्रकल्प संचालकांनी येथे येऊन आम्हाला आश्वासन द्यावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले.