24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रकन्नड मतदारसंघात संजना जाधव विजयी

कन्नड मतदारसंघात संजना जाधव विजयी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लागलेला निकाल हा अनेकांसाठी आश्चर्यचकित करणारा आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीला मिळालेले यश हे अभूतपूर्व मानले जात आहे. कन्नड मतदारसंघात पूर्वाश्रमीची पत्नी विरुद्ध पती अशी लढत होती. रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव विरुद्ध हर्षवर्धन जाधव यांच्यातील लढत ही दोघांसाठीही प्रतिष्ठेची होती. काही दिवसांआधी संजना जाधव या प्रचारादरम्यान हर्षवर्धन जाधव यांच्यावर गंभीर आरोप करत ढसाढसा रडल्या होत्या. हे भाषण संजना जाधव यांच्या यशासाठी कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे.

संजना जाधव यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली तर त्यांचे पती हर्षवर्धन जाधव हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते. या मतदारसंघात उदयसिंह राजपूत हे उद्धव ठाकरे गटाकडून उभे होते. महत्त्वाचे म्हणजे ते या मतदारसंघातले प्रबळ दावेदार मानले जात होते. येथे मुख्य लढत एकनाथ शिंदे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या गटात होती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजना जाधव निवडणूक रिंगणात, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उदयसिंह राजपूत हे रिंगणात होते. १७ व्या फेरीमध्ये संजना जाधव या एकूण ५४,४६४ मतांनी आघाडीवर होत्या.

१६ व्या फेरीत २९,१४१ मते उदयसिंह राजपूत यांना मिळाली. संजना जाधव या सुरुवातीपासूनच आघाडीवर होत्या. रावसाहेब दानवे यांंची लेक संजना जाधव या विजयी झाल्या आहेत.

कन्नड विधानसभा मतदारसंघ हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. हर्षवर्धन जाधव यांचे वडील रायभान जाधव हे देखील आमदार होते. अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणूण त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ओळखले जाते. पाणी प्रश्नासाठी त्यांनी केलेले काम हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांचे पुत्र हर्षवर्धन जाधव हे देखील मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते त्यानंतर त्यांनी शिवसेनेत देखील प्रवेश केला होता.

हर्षवर्धन जाधव यांचा विवाह भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना यांच्याशी झाला होता. मात्र हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांच्यात खटके उडाले. हर्षवर्धन जाधव यांनी त्यासाठी सासरे रावसाहेब दानवे यांना जबाबदार धरले. संजना जाधव यांनी निवडणुकीत नशीब आजमावयाचे ठरविल्यानंतर रावसाहेब दानवेंनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संजना जाधव यांचा शिवसेनेत रीतसर प्रवेश केला आणि कन्नड मतदारसंघातून उमेदवारी दिली. इतर मतदारसंघांच्या तुलनेत या मतदारसंघातील निकालाची अधिक चर्चा होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR