मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे कथित दूषित कफ सिरप प्यायल्यामुळे ११ मुलांचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक अधिका-यांनी एका डॉक्टरला अटक केली आहे. प्रवीण सोनी असे या डॉक्टरचे नाव असून त्याने या मुलांना ‘कोल्ड्रिफ’ नावाचे सिरप लिहून दिले होते. यापैकी बहुतांश मुलांवर त्याच्या परसिया येथील क्लिनिकमध्ये उपचार करण्यात आले होते. या कथित दूषित औषधाबद्दल पोलिसांनी तामिळनाडूस्थित औषध उत्पादक कंपनीच्या निर्मात्यावर गुन्हा दाखल केला आहे. घातक औद्योगिक रसायनाने भेसळयुक्त ‘कोल्ड्रिफ’ कफ सिरपच्या सेवनामुळे तीव्र मूत्रपिंड निकामी होऊन ११ मुलांचा मृत्यू झाल्याच्या आरोपावरून मध्य प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली.
पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यू हे कफ सिरप दिल्यानंतर झाला. ज्यात डायथिलीन ग्लायकोल हे विषारी रसायन आढळले. हे रसायन अँटीफ्रीझ आणि ब्रेक फ्ल्युईड्समध्ये वापरले जाते. कांचिपूरम येथील ‘स्त्रेसन फार्मास्युटिकल्स’ने उत्पादित केलेल्या कोल्ड्रिफ सिरपमध्ये ४८.६ टक्के डायथिलीन ग्लायकोल होते, तर सरकारी औषध चाचणी प्रयोगशाळा भोपाळच्या वेगळ्या चाचणीत हे विषारी संयुग ४६.२८ टक्के आढळले. दोन्ही अहवालांनी हे नमुने ‘भेसळयुक्त आणि आरोग्यासाठी हानिकारक’ असल्याचे घोषित केले आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे झालेल्या मृत्यूंमुळे देशभरात धोक्याची घंटा वाजू लागली असून अनेक राज्यांनी तपास आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. केंद्रातील औषध मानक नियंत्रण संस्थेने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या सहा राज्यांमधील औषध उत्पादन युनिट्सची धोका-आधारित तपासणी सुरू केली आहे.
छिंदवाडा येथील मृत्यू एक महिन्याच्या कालावधीत झाले आहेत. सर्व मुलांचे वय पाच वर्षापेक्षा कमी होते आणि स्थानिक डॉक्टरांनी खासगी क्लिनिकमध्ये लिहून दिलेल्या ‘कोल्ड्रिफ’सह इतर कफ सिरप घेतल्यानंतर त्यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याची माहिती आहे. मुलांना सुरुवातीला सर्दी आणि सौम्य तापाची लक्षणे होती आणि त्यांच्यावर कफ सिरप तसेच नियमित औषधे देऊन उपचार करण्यात आले होते. मात्र, मूत्र उत्पादन कमी होणे आणि मूत्रपिंडाच्या तीव्र गुंतागुंतीमुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. छिंदवाडा व परसिया परिसरातून १४ रुग्ण नागपुरातील मेडिकलमध्ये तर एम्समध्ये गत दीड महिन्यात ९ मुले अत्यवस्थ अवस्थेत दाखल झाली. त्यापैकी मेडिकलमध्ये सहा, तर एम्समध्ये एक रुग्ण दगावला. लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशासाठी खोकल्यावरील औषधे आणि सर्दीवरील औषधांच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत.
त्यानुसार बालरोगतज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचा-यांना लहान मुलांना ही औषधे देताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की, दोन वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधे देऊ नयेत. तसेच पाच वर्षांखालील मुलांना ही औषधे सामान्यत: शिफारस केलेली नाहीत. कारण, लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार आपोआप बरे होतात. त्यासाठी औषधांची गरज पडत नाही. आरोग्य केंद्रे व दवाखान्यांनी केवळ उत्तम उत्पादन मानकांनुसार तयार केलेली आणि उच्च दर्जाची कफ सिरप खरेदी करावीत, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे पाच वर्षांखालील मुलांसाठी कफ सिरपची शिफारस केली जात नाही. मोठ्या मुलांसाठी त्याचा वापर काळजीपूर्वक केला जातो. मुलांना होणारे खोकल्याचे आजार हे आपोआप बरे होतात आणि अनेकवेळा औषधांशिवाय खोकला बरा होतो. पाणी जास्त पिणे, पुरेशी विश्रांती आणि घरगुती उपायांसह बिगर औषधी उपाय हा पहिला दृष्टिकोन असावा असे मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे.
राजस्थानमध्ये भरतपूर आणि झुंझुनू जिल्ह्यात दोन मुलांचा मृत्यू झाला. चुरु जिल्ह्यातही एका मुलाचा मृत्यू झाला. या मुलांचा मृत्यू कफ सिरपमुळे झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला. राजस्थानचे आरोग्यमंत्री गजेंद्रसिंह म्हणाले, औषधांची आम्ही तपासणी केली. त्यात जीवघेणा असा कोणताच पदार्थ आढळला नाही. तरीही या प्रकरणाच्या चौकशीसाठी आम्ही एक समिती बनवली आहे. सर्वसामान्य व्यक्तीला औषध खरे आहे की बनावट ते ओळखू येत नाही. सर्वसाधारणपणे सिरपची बांधणी कशी आहे, त्याचा रंग ढगाळ दिसतो की बदलला आहे अथवा त्यात काही कण दिसतात का, औषधातील मीठ खाली बसले आहे का ते बघायला हवे. बॅच नंबर लिहिलेला आहे की नाही किंवा पुसून टाकला आहे याकडेही लक्ष द्यायला हवे. औषधावर ड्रग लायसेन्स आहे की नाही, तो नसेल तर अशी औषधे घेऊ नयेत असे सांगितले जात आहे. सावधगिरीच्या दृष्टीने हे आवश्यक असले तरी सर्वसामान्य व्यक्ती अशी खबरदारी कशी काय घेऊ शकेल हा खरा प्रश्न आहे. देशात गत काही काळापासून औषधांचा आणि बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. तो दूर करण्यासाठी केंद्रीय स्तरावर धडक मोहीम आखण्याची गरज आहे.
त्यादृष्टीने धोरण तयार करणे ही तातडीची गरज आहे परंतु त्याकडे अद्याप लक्षच देण्यात आले नाही ही दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. रुग्णांच्या आयुष्याशी खेळ करणारी ही विषवल्ली मुळापासून उखडून टाकणे अत्यावश्यक आहे. देशात विशेषत: ग्रामीण भागात अनेक बोगस डॉक्टर प्रॅक्टिस करत आहेत. त्यांच्या चुकीच्या उपचारांमुळे नाहक बळी जात आहेत. बोगसगिरी करणारे हे भोंदू इतके निर्ढावलेले आहेत की, त्यांना कोणाचाच धाक उरलेला नाही. औषधनिर्मितीमध्येही तसेच. भारतातील एका सिरपमुळे आफ्रिकेतील एका देशात ७० एक लहान मुलांचा मृत्यू झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेनेही भारतीय औषधांबाबत अलर्ट जारी केला होता. अशा प्रकारामुळे शेवटी भारताचीच प्रतिमा खराब झाली. अशा गोष्टींना मज्जाव करण्यासाठी कायदेही आहेत. मात्र, त्यातूनही पळवाटा काढल्या जातात. त्यासाठी कायद्यातील तरतुदी अधिक कठोर करायला हव्यात. नियमितपणे बोगस डॉक्टर आणि बोगस औषधांची तपासणी करणे आवश्यक बनले आहे.