लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दि. २७ मार्च रोजी महानगरपालिकेचा २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प मांडला. कुठलीही कर वाढ किंवा नवीन करांचा बोजा न टाकता नागरीकांच्या सूचनांचा अंतर्भाव करुन त्यांनी १७ लक्ष रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात पाणीपुरवठा विभागांतर्गत केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान २.० अंतर्गत २५९.२२ कोटी रुपयांना मान्यता मिळाली असून काही महिन्यांत ही योजना पुर्ण होऊन विस्तारीत लातूर शहरास सुरळीत पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे, असे लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगीतले.
महानगरपालिकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, मुख्य परिक्षक कांचन तावडे, मुख्य लेखाधिकारी रावसाहेब कोलगने, उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, लेखाधिकारी शेख समद यांची प्रमुख उपस्थिती होती. या अर्थसंकल्पाच्या अपेक्षीत प्रारंभीच्या शिलकीसह महसूली उत्पन्न, कर्ज, निधी, शासकीय योजना, केंद्राचे अनुदान यातून महानगरपालिकेच्या तिजोरीत १०६४.०७ कोटी रुपयांची भर पडणार आहे तर २०२५-२६ साठी एकुण खर्च १०६३.९० कोटी ग्रहीत धरण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प १७ लक्ष रुपये शिलकीचा असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
यावर्षी मनपाने सादर केलेल्या अंदाजपत्रकात दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत शहरातील दारिद्रय रेशेखालील कुटूंबातील सदस्यांसाठी शहरी बेरोजगारांना निवारा, पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधीअंतर्गत लातूर मनपाकरीता ७६५९ कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यापैकी ७६६१ कर्ज प्रकरणे बँकेकडे पाठविण्यात आले असून त्यापैकी ६९७५ प्रकरणे बॅकेमार्फत मंजूर करण्यात आले व त्यापैकी ६७५० लाभार्थ्यांना पहिला टप्पा १० हजार रुपयांप्रमाणे ६ कोटी ७६ लक्ष कर्ज प्रकरणे वाटप झालेले आहे. दुस-या टप्प्यात १२ कोटी २३ लक्ष७० हजार बँकामार्फत कर्ज वाटप करण्यात आले आहे.
विस्तारीत आरोग्य सेवांतर्गत शहरातील २३ आयुष्यमान आरोग्य मंदीरांतून केंद्रामार्फत एप्रिल २०२४ ते फेबु्रवारी २०२५ पर्यंत एकुण ९०८८१ रुग्णांना बा रुग्ण सेवा देण्यात आलेली आहे. शहरातील ८ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांतून एप्रिल २०२४ ते फेबु्रवारी २०२५ पर्यंत एकुण ५९७७ रुग्णांना रुग्णसेवा देण्यात आली आहे. जननी सुरक्षा योजनेअंतर्गतही ७९२ प्रसूत महिलांना लाभ देण्यात आला आहे. जननी रथ, मिशन साद, अद्ययावत नेत्र तपासणी, अद्ययावत दंत चिकित्सा, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, महिलांना मोफत सीटीबस प्रवास, दिव्यांग सन्मान निधी, मागासवर्गीय दुर्बल घटक, महिला व बालकल्याण विभाग, ई-प्रशासन, घनकचरा व्यवस्थापन, सरळसेवा पदाक भरती, मालमत्ता, शिक्षण, मनपा सभागृह बांधणे, पाणीपुरवठा, रस्त्यांचे मजबुतीकरण, राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७५ फुट उंच पुतळा उभारणे, अग्निशमन व आणीबाणी सेवा सक्षमीकरण आदी ठळक बाबींचा उल्लेख आयुक्त मनोहरे यांनी अर्थसंकल्पात करुन या सर्वबाबी सक्षमपणाने पुर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. यावेळी खदीर शेख, रुक्मानंद वडगावे, डॉ. महेश पाटील, संतोष लाडलापूरे, जाफर कादरी, बंडू किसवे, बंडू आर्वीकर, बालाजी शिंदे यांची उपस्थिती होती.