लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दि. २७ मार्च रोजी महानगरपालिकेचा २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प मांडला. कुठलीही कर वाढ किंवा नवीन करांचा बोजा न टाकता नागरिकांच्या सूचनांचा अंतर्भाव करुन त्यांनी १७ लक्ष रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात पाणीपुरवठा विभागांतर्गत केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान २.० अंतर्गत २५९.२२ कोटी रुपयांना मान्यता मिळाली असून काही महिन्यांत ही योजना पुर्ण होऊन विस्तारीत लातूर शहरास सुरळीत पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे असे लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगीतले.
महानगरपालिकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त देवीदास जाधव, मुख्य परिक्षक कांचन तावडे, मुख्य लेखाधिकारी रावसाहेब कोलगने, उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, लेखाधिकारी शेख समद यांची प्रमुख उपस्थिती होती.
या अर्थसंकल्पाच्या अपेक्षीत प्रारंभीच्या शिलकीसह महसूली उत्पन्न, कर्ज, निधी, शासकीय योजना, केंद्राचे अनुदान यातून महानगरपालिकेच्या तिजोरीत १०६४.०७ कोटी रुपयांची भर पडणार आहे तर २०२५-२६ साठी एकुण खर्च १०६३.९० कोटी ग्रहीत धरण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प १७ लक्ष रुपये शिलकीचा असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.