पुणे : प्रतिनिधी
राज्यात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावरून राज्य महिला आयोगावर टीका केली जात आहे. विरोधकांकडून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच करुणा मुंडे यांनी देखील महिला आयोगाने निकाली काढलेल्या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
नुकतीच करुणा मुंडे यांनी पुण्यात कस्पटे कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले तसेच वैष्णवीच्या आईवडिलांशी संवाद साधला. वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणामध्ये तिच्या सासरच्या मंडळींवर मानसिक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर करुणा मुंडे यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. वैष्णवीने आत्महत्या केली, असे मला वाटत नाही. तिची हत्या झाली आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
तिला मारहाण करून गळफास दिला गेला असावा, असे वाटत असल्याचे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. अशा घटना घडत राहतात कारण शासन याकडे लक्ष देत नाही आणि योग्य कारवाई करत नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
किती तक्रारींचा निपटारा…
राज्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. करुणा मुंडे यांनी देखील आयोगाच्या अध्यक्षांबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. रुपाली चाकणकर या फक्त आपल्याकडे ३५००० महिलांच्या तक्रारी आल्याचे सांगत आहेत. मात्र, त्यातील किती तक्रारींचा निपटारा केला, याबाबत त्या सांगत नाहीत, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे