शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
राज्य सरकारने शेतक-यांसाठी कर्जमाफीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यभरातील शेतक-यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतक-यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, घोषणा झाल्यानंतरही प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप सुरू न झाल्याने शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
सरकारकडून लाभार्थ्यांची पात्रता, कर्जमाफीची मर्यादा, निधी वितरण आणि बँकांमार्फत अंमलबजावणी याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली जात आहे मात्र, ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून पात्र शेतक-यांच्या खात्यावर कर्जमाफीचा लाभ तातडीने द्यावा, अशी मागणी शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतक-यांना बियाणे, खते आणि शेतीसाठी आवश्यक भांडवलाची गरज भासणार आहे. कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळाल्यास नव्या हंगामासाठी आर्थिक दिलासा मिळेल आणि शेतीची कामेही सुरळीतपणे करता येतील, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
















