32.7 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeमहाराष्ट्रकर्जमाफीसाठी राज्यात पेटणार मशाल

कर्जमाफीसाठी राज्यात पेटणार मशाल

बच्चू कडूंचा कृषिमंत्र्यांवर प्रहार

नाशिक : प्रतिनिधी
शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू पुन्हा सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. कर्जमाफीसाठी ते आता मशाल आंदोलन करणार आहेत. त्यांच्या या आंदोलनाची राज्यभरात चर्चा आहे.

दरम्यान, शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू पुन्हा सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. कर्जमाफीसाठी ते आता मशाल आंदोलन करणार आहेत. महायुतीत ते गेल्यावेळी मंत्री होते. पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी वेगळा घरोबा केला. विधानसभेत त्यांना आमदारकी टिकवता आली नाही. तरीही प्रहार संघटनेच्या माध्यमातून ते अनेकदा भूमिका घेताना दिसतात. सध्या त्यांनी कर्जमाफीसाठी एल्गार पुकारला आहे. त्यांच्या या आंदोलनाची राज्यभरात चर्चा आहे.

कर्जमाफीसाठी एल्गार
उद्या रात्री (११ एप्रिल) बच्चू कडू, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकमधील निवासस्थानासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहेत. तर दुसरीकडे राज्यभरातील प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहेत. सरकारने निवडणुकीमध्ये शेतक-यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, परंतु शेतक-­यांची कर्जमाफी केली नाही त्यामुळे बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. शेतक-­यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

सरकारचे धोरण शेतक-यांना मारक
ज्या सरकारच्या धोरणामुळे आमच्या शेतक-­यांच्या घरातील दिवे विझायला लागले त्या विरोधात आम्ही आंदोलन करू, असे कडू म्हणाले. शेतक-­यांचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे ते कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले. हातात मशाल, गळ्यात निळा दुपट्टा आणि भगवा झेंडा घेऊन आम्ही आंदोलन करू असे त्यांनी स्पष्ट केले.

कर्जमाफीला सरकारकडे पैसे नाहीत, अपंगांना द्यायला पैसे नाहीत असे सरकार म्हणते. सरकारच्या धोरणामुळे शेतक-­यांचे नुकसान होत आहे. भगवा झेंडा घेऊन आणि रामचंद्राची शपथ घेऊन तुम्ही कर्जमाफी करणार म्हणून सांगितले होते. रामचंद्राला तर तुम्ही बेइमान झालेच पण जनतेसोबत देखील बेइमान झाले. ही बेइमानी आम्ही उखडून काढू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

कोकाटे यांच्यावर टीका
माणिकराव कोकाटे यांनी पद आल्यानंतर शेतक-यांविषयी असे वक्तव्य करणे योग्य नाही. ते बदलतील असे वाटत नव्हते. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असे कडू म्हणाले. माणिकराव कोकाटे तुम्ही कृषिमंत्री आहात. तुम्ही शेतक-­यांचे पालक आहात. मी त्यातला नाही असे म्हणून जर तुम्ही जबाबदारी झटकत असाल तर गाठ प्रहारशी आहे, असा सज्जड दम त्यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR