28.3 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeउद्योगकर्जापेक्षा वसुली जास्त; विजय मल्ल्या कोर्टात

कर्जापेक्षा वसुली जास्त; विजय मल्ल्या कोर्टात

बंगळुरू : वृत्तसंस्था
किंगफिशर एअरलाइन्स विरुद्धच्या कर्जवसुली प्रक्रियेला विजय मल्ल्याने कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. किंगफिशर एअरलाइन्सवर जवळपास ६२०० कोटी रुपयांचे कर्ज होते असा दावा विजय मल्ल्याने केला. बँकेच्या अधिका-यांनी सुरुवातीच्या कर्जाच्या रकमेपेक्षा कितीतरी जास्त रक्कम वसूल केली असल्याचे त्याचे म्हणणे आहे. ही याचिका ३ फेब्रुवारी २०२५ रोजी दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती आर. देवदास यांच्यासमोर बुधवारी या प्रकरणाची संक्षिप्त सुनावणी झाली.

जोपर्यंत संबंधित पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही तोपर्यंत आपण अंतरिम दिलासा मागत नसल्याचे विजय मल्ल्याची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील साजन पूवय्या यांनी उच्च न्यायालयात सांगितले. न्यायालयाने १० बँका, एक वसुली अधिकारी आणि अ‍ॅसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीला नोटीस बजावली आहे. त्यांना याचिकेत पक्षकार बनवण्यात आले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला विजय मल्ल्याने अनेक राष्ट्रीय आणि खासगी बँकांविरुद्ध (स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीसह) वसुली प्रक्रियेला आव्हान दिले होते. वसुलीची प्रक्रिया तूर्तास थांबवावी आणि अंतरिम स्थगिती आदेश जारी करावा, अशी विनंती मल्ल्याने याचिकेत केली.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विजय मल्ल्यानं सोशल मीडिया पोस्टद्वारे दावा केला होता की, बँकांनी ६,२०३ कोटी रुपयांच्या कर्जाच्या रकमेव्यतिरिक्त व्याज वसूल केले आहे. ही डेट रिकव्हरी ट्रिब्युनलनं निश्चित केली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत विजय मल्ल्याची १४,१३१.६ कोटी रुपयांची मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना परत करण्यात आल्याचे सांगितले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR