रेणापूर : प्रतिनिधी
आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना दिलासा देण्याऐवजी कर्जवसुलीच्या नावाखाली त्यांचा मानसिक छळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार रेणापूर तालुक्यातील खलंग्री येथे मंगळवार दि. १७ ऑक्टोबर रोजी घडला. अवघ्या २२ हजार रुपयांच्या कर्जाच्या वसुलीसाठी मायक्रो फायनान्स कंपनीच्या एजंटने सतीश बोळंगे व गजानन बोळंगे या शेतक-यांना फोनवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वसुली पद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
एकीकडे शेतीतील सततची अनिश्चितता, नापिकी, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक अडचणी यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत कर्जाची परतफेड करण्यासाठी काही दिवसांची मुदत देण्याऐवजी वसुली एजंटांकडून फोनवरून शिवीगाळ आणि दमदाटी केली जात असेल, तर शेतक-यांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जवसुलीच्या नावाखाली शेतकरी व सामान्य कर्जदारांना बळजबरी, दमदाटी किंवा मानसिक त्रास देण्याचे प्रकार सहन केले जाणार नसल्याची भूमिका मांडली आहे.
वसुलीच्या नावाखाली कायद्याचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई होणे अपेक्षित असतानाही अशा घटना घडत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कर्जाची रक्कम थकीत असली तरी कर्जदाराला शिवीगाळ करणे, अपमानित करणे किंवा मानसिक त्रास देणे हा वसुलीचा मार्ग असू शकत नाही. संबंधित मायक्रो फायनान्स कंपनीने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित एजंटवर कारवाई करावी, तसेच शेतक-यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. तसेच कर्जवसुलीच्या नावाखाली शेतक-यांचा अपमान करण्याचा अधिकार कोणाला? असा सवाल आता खलंग्रीसह परिसरातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.
















