मुंबई : प्रतिनिधी
जातनिहाय जनगणनेनंतर सर्वच समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. सरकारने जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून तेलंगणा व कर्नाटक पॅटर्न राबवावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. मुंबईच्या टिळक भवनातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, जातनिहाय जनगणना ही केवळ शिरगणती नाही, तर सामाजिक अजेंडा आहे. महाराष्ट्रात ओबीसींची संख्या २७ वरून वाढून ६४ टक्क्यापर्यंत जाऊ शकते. या जनगणनेमुळे प्रत्येक समाज घटकांची लोकसंख्या किती हेही समजेल, पाटीदार, गुर्जर, मराठा आरक्षणाचा प्रश्नही यामुळे सुटण्यास मदत होईल. भाजपा सरकारला जातनिहाय जनगणनेचा निर्णय घ्यावा लागला याचे सर्व श्रेय राहुल गांधी यांना जाते, त्यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला. सरकारने याची प्रक्रिया काय आहे? माहिती कशी जमा करायची? याचे प्रशिक्षण कर्मचारी अधिकारी यांना दिले पाहिजे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
लोकसभेतील विरोध पक्षनेते राहुल गांधी बिहारमध्ये ‘पलायन रोको नोकरी दो’ अभियानासाठी जात असताना त्यांचा तोफा पोलिसांनी अडवला. यातून सत्तेचा माज दिसतो आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास जाणे हा काय गुन्हा आहे का? पण भाजपा आघाडीचे सरकार लोकशाही मानत नाही. हा सर्व प्रकार तानाशाहीचा असून मुलभूत अधिकारांवर घाला घालणारा आहे. काँग्रेस पक्ष याचा निषेध करत आहे, असे सपकाळ म्हणाले.