रायचूर : वृत्तसंस्था
कर्नाटक राज्यात एका जीवघेण्या विषाणूचा कहर पाहायला मिळत आहे. कर्नाटक बर्ड फ्लू या आजाराच्या धक्क्यातून सावरत असतानाच आता मांजरांमध्ये एफपीव्ही नावाच्या एका जीवघेण्या विषाणूचा कहर सुरू झाला आहे. कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात एफपीव्ही या विषाणूने थैमान घातले आहे. यामुळे आतापर्यंत शेकडो मांजरांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूची लागण झालेल्या मांजरींच्या जगण्याची शक्यता फक्त १ टक्का असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
कर्नाटकमधील रायचूर जिल्ह्यात एफपीव्ही या विषाणूचे थैमान सुरु आहे. एफपीव्ही हा अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे. हा विषाणू वेगाने पसरतो. जर गटातील एका मांजराला या विषाणूची लागण झाली असेल तर काही क्षणांतच इतर मांजरांनाही या आजाराची लागण होते. या आजारावर कोणताही उपचार नाही. यामुळे मांजरीचे पालन करणा-यांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
रायचूर जिल्ह्यात या विषाणूचा कहर सुरु असून संपूर्ण राज्यात हा विषाणू पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, मांजर पाळणा-यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. एडिनबर्ग प्राणी रुग्णालयातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एफपीव्ही या विषाणूचा मानवांना किंवा कुत्र्यांना कोणताही धोका नाही. मात्र आपण घातलेले कपडे, शूज किंवा हातांमुळे या विषाणूचा मांजरांमध्ये प्रसार होऊ शकतो.