21.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमुख्य बातम्याकर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पेटणार; संचारबंदीचे आदेश

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पेटणार; संचारबंदीचे आदेश

बेळगाव : वृत्तसंस्था
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे सोमवारी बेळगावच्या वॅक्सिन डेपो मैदानात महाअधिवेशन होणार आहे. पण या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरात कर्नाटक सरकारकडून उद्या सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच कर्नाटक सरकारकडून वॅक्सिन डेपो मैदानाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची ही एकप्रकारे गळचेपी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यास कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे. मराठी भाषिक एकत्र जमू नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. तर दुसरीकडे मराठी भाषित जनता देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महामेळाव्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे संबंधित परिसरात तणाव वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा घेत असते. मात्र, यावर्षी कर्नाटक सरकारने मेळाव्याला परवानगी नाकारली. त्यामुळे कर्नाटक सरकारची दडपशाही सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठी भाषिकांनी कर्नाटक सरकारला मोठा इशारा दिला आहे. कितीही संचारबंदी आणि पोलिसांना तैनात केलं तरी आम्ही वॅक्सिन डेपो मैदानात एकत्र जमणार असल्याचा इशारा दिला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिका-यांनी देखील मैदान परिसरात येऊन पाहणी केली. मेळाव्यासाठी कशाप्रकारे नियोजन करता येईल याची खात्री पदाधिका-यांनी केली. त्यामुळे उद्या या महामेळाव्याला परवानगी दिली जाणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR