बंगळूर : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री सिद्धरामय्या पायउतार झाले, तर मुख्यमंत्रिपद दलित समाजातील सदस्याला मिळावे, या दृष्टिकोनातून काँग्रेसमधील दलित मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहेत. सतत त्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. सतीश जारकीहोळी यांनी सिद्धरामय्या यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे मंत्री एच. सी. महादेवप्पा यांची भेट घेऊन चर्चा केली.
राज्यात ‘मुडा’ प्रकरण उजेडात आल्याने आणि सिद्धरामय्या यांच्यावर एफआयआर दाखल होताच दलित मुख्यमंत्र्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचा पुढील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या समर्थकांकडून प्रचार करण्यात आला.
२०२८ मध्ये मुख्यमंत्री होण्याची तयारी असल्याचे सांगतानाच समर्थकांची इच्छा नम्रपणे धुडकावून लावणारे सतीश जारकीहोळी यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या बदलले तर, मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारा, असे त्यांनी सांगितल्याचे समजते.
सिद्धरामय्या आमचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत. सिद्धरामय्या पाच वर्षे सत्तेत राहणार की तीन वर्षेच, हे हायकमांडने सांगावे, असे ते म्हणाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री बनले तरी त्यांना आक्षेप नाही. यासंदर्भात हायकमांडने माझ्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. यापुढील कोणताही निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यावा, असे सतीश जारकीहोळी म्हणाले.