शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतमधील ४२ ग्रामपंचायत कर्मचारी, ४२ ग्राम रोजगार सेवक व ३३ संगणक परिचालक यांनी सोमवारपासून आपले काम बंद ठेवून आंदोलनात सहभागी झाल्याने ग्रामीण भागातील गावगाडा थांबला असून या आंदोलनामुळे ग्रामपंचायत स्तरांवरील कामे खोळंबल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास आमदार निधीप्रमाणे ग्रा.पं. सदस्य निधी असावा, भरीव वाढ करून थकीत मानधन शासनाने अदा करावे, विमा संरक्षण द्यावे, विधान परिषदेच्या निवडणुकीत ग्रा.पं.सदस्यांना मतदानाचा अधिकार असावा, सरपंच आमदार असावा, मुंबईत सरपंच भवन असावे, दरवर्षी किमान दहा लाख रुपये निधी असावा अशा सरपंचाच्या मागण्या आहेत. ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृती बंधानुसार संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात यावा व तोपर्यंत किमान वेतन म्हणून विस हजार रुपये देण्यात यावेत. संगणक परिचालकांवर नव्याने लादलेली चुकीचे टार्गेट सिस्टीम रद्द करण्यात यावी, अशी मागणी संगणक परिचालक संघटनेची आहे.
२ मे २००५ च्या शासन निर्णयात सुधारणा करून अर्धवेळ ऐवजी पुर्ण वेळ करणे, दरमहा किमान पंधरा हजार मानधन द्यावे, विमा संरक्षण द्यावे, बँकेच्या वैयक्तीक खात्यावर मानधन जमा व्हावे, विनाकारण कामावरून कमी केलेल्या ग्राम रोजगार सेवकांना परत कामावर घेण्यात यावे. ग्रामपंचायत कर्मचा-यांना नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचा-याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, त्यासाठी सहाय्यक अनुदान शासनाने द्यावे, भविष्य निर्वाह निधीची रक्कम जिल्हा कामगार भविष्य निधी संघटना ई .एस . आय . सी . या कार्यालयाकडे जमा होण्यासाठी धोरणात्मक निर्णय व्हावा, जिल्हा परिषदेकडील वर्ग तीन व वर्ग चारच्या पदासाठी २० टक्के आरक्षण लागू व्हावे, जिल्हा परिषदेमधील वर्ग तीन व चारची पदे ग्रामपंचायत कर्मचा-यांमधून भरण्यासाठी तात्काळ मंजुरी द्यावी, अशा विविध मागण्यांच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी,संगणक परिचालक व ग्राम रोजगार सेवक यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.