,सोलापूर : महापालिका कर आकारणी विभागाने यंदाच्या वर्षात सर्वाधिक वसुली १६१ कोटी इतकी केली आहे. उद्दिष्ट ३१५ कोटी इतके असून उद्दिष्टपूर्तीसाठी आणखी दोन महिने शिल्लक आहे. थकबाकीदारांवर कारवाई सुरू असून ३२ मिळकतदारांच्या उताऱ्यावर बोजा चढविण्यासाठी नोटीस बजाविली आहे.
महापालिकेत आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर यांच्या उपस्थितीत २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात संबंधित विभागाने केलेला जमा-खर्च व दिलेल्या उद्दिष्टपूर्तीची माहिती घेतली जात आहे. त्यामध्ये कर आकारणी विभागाने बैठकीत लेखाजोखा मांडला. या विभागाला ३१५ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. दहा महिन्यात १६१ कोटी रुपये इतकी वसुली या विभागाने केली आहे.
थकबाकीदारांवर कारवाई मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे उर्वरित दोन महिन्यात उद्दिष्टापर्यंत पोचू असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येणाऱ्या विविध दंडात्मक कारवाईतून २५ लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले असता या विभागाने उद्दिष्टापेक्षा पुढे जाऊन ३५ लाख रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहे.
नगरअभियंता विभागाला ७ कोटी ६६ लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. या विभागाने ४ कोटी रुपयांचे उत्पन्न विविध हेडमधून प्राप्त झाले आहे. नगररचना बांधकाम विभाग, पाणीपुरवठा व ड्रेनेज आणि कर आकारणी हे तीन विभाग उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाचे विभाग आहेत. त्यातही महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न हे कर आकारणी व संकलन विभागातून मिळत असल्याने या विभागाच्या उद्दिष्टावर महापालिकेचे अर्थकारण आणि शहराचा विकास अवलंबून आहे.