21.1 C
Latur
Saturday, September 27, 2025
Homeलातूरकला आणि संगीत जीवनातील एकसुरीपणा घालवून जीवन समृद्ध करतात

कला आणि संगीत जीवनातील एकसुरीपणा घालवून जीवन समृद्ध करतात

लातूर : प्रतिनिधी
डॉ. संदीपान जगदाळे यांनी शिक्षण क्षेत्रात नवनवीन अध्यापन पद्धती विकसित करून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेले प्रयोग अत्यंत स्तुत्य आहेत. जीवनाचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर कलेला महत्त्व द्यावे लागते. कला आणि संगीत जीवनातील एकसुरीपणा घालवून जीवन समृद्ध करतात, असे प्रतिपादन माजी मंत्री सहकार महर्षि दिलीपराव देशमुख यांनी केले.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवणारे प्रा. डॉ. संदीपान जगदाळे यांना यंदाचा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. या मानाच्या पुरस्कारानंतर दयानंद शिक्षण संस्था व आवर्तन प्रतिष्ठान यांच्या वतीने त्यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, संजय बोरा, विशाल लाहोटी, विशाल अग्रवाल, डॉ. जयप्रकाश दरगड, आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा, सचिव डॉ. रवीराज पोरे, आबासाहेब पाटील, संभाजी सुळ, विशाल जाधव आदी मान्यवर, संस्थेचे सदस्य, प्राध्यापक, कर्मचारी व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय संगीत जगात सर्वोच्च आहे; पाश्चात्य संगीत फक्त मेंदूपर्यंत पोहोचते, परंतु भारतीय संगीत हृदयाला स्पर्श करते, असे सांगून माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, समाजाभिमुख कार्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले योगदान लक्षणीय असून, याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय पातळीवरील हा मानाचा सन्मान मिळालेला आहे. हा गौरव संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक समाजाचा अभिमान आहे.
यावेळी लाहोटी म्हणाले, प्रा. डॉ. संदीपान जगदाळे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने लातूर जिल्ह्याची तसेच कला व संगीत क्षेत्राची एक नवी ओळख निर्माण झाली आहे. देशमुख घराणे आणि दयानंद शिक्षण संस्थेचे नाते सुरुवातीपासूनच जिव्हाळ्याचे राहिले आहे. भविष्यात फिजिओथेरपी, नर्सिंग आणि सीबीएससीच्या माध्यमातून ज्ञानाच्या कक्षा रुंदवण्यासाठी संस्था सतत प्रयत्नशील राहील. कार्यक्रमाचे प्रस्ताविकेत बियाणी म्हणाले की, संस्था नेहमीच कला, क्रीडा, नाटक, संगीत यांना प्राधान्य देत असते. विद्यापीठ आयोजित युथ फेस्टिवलमध्ये कला व वाणिज्य महाविद्यालयाला दरवर्षी प्रथम व द्वितीय क्रमांकाचे मानांकन मिळणे अभिमानास्पद आहे. भविष्यात संगीताचा रोडमॅप तयार करून संस्था ऑनलाईन प्रशिक्षण व संशोधन क्षेत्रातही अग्रेसर राहील.
राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कर्ते प्रा. डॉ. जगदाळे म्हणाले की, मी  एका छोटयाशा गावातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी दयानंद शिक्षण संस्थेत आलो आणि इथूनच माझ्या जीवनाला यशाच्या पाय-या चढण्याची संधी मिळाली. संस्थेने दिलेले स्वातंर्त्य, पाठिंबा आणि प्रोत्साहन यामुळेच आज शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार मला मिळाला आहे. हे यश म्हणजे दयानंद शिक्षण संस्थेच्या प्रेरणेचे फलित आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गणेश लहाने यांनी केले. तर आभार प्रदर्शन अभय शहा यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR