ठाणे : ठाण्याला लागूनच असलेल्या कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासंदर्भातील महत्त्वाचा निकाल आज सत्र न्यायालयाने दिला आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आहे की मशीद यासंदर्भातील निकाल न्यायालयाने दिला आहे. दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच असल्याचा निर्वाळा न्यायालयाने केला आहे. मागील ब-याच काळापासून या प्रकरणार सुनावणी सुरू होती. अखेर या प्रकरणाचा निकाल आता लागला आहे.
कल्याणमधील सत्र न्यायालयाने ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिरच असल्याचे आदेश जारी केले आहेत. १९७१ साली ठाणे जिल्हा अधिका-यांकडे मंदिर का मशीद यावरून सुनावणी झाली होती. न्यायालयाने या किल्ल्यावर मंदिरच असल्याचे स्पष्ट केल्यानंतर हिंदू संघटनेचे पदाधिकारी व शिवसेनेच्या पदाधिका-यांनी कल्याण दुर्गाडी किल्ल्यावर आरती करत जल्लोष साजरा केल्याचे पहायला मिळाले.
दरवर्षी होत होते घंटानाद आंदोलन
अनेकदा या भागामध्ये धार्मिक तणाव निर्माण करणा-या या प्रकरणावर निकाल लागल्याने आता हा वाद शांत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मागील काही वर्षांमध्ये बकरी ईदच्या निमित्ताने मुस्लिम समुदायाकडून दुर्गाडी किल्ला या भागात असलेल्या मशिदीत नमाज अदा केली जाते. मात्र या कालावधीत खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर बंद ठेवले जायचे.
त्यामुळेच या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणात आंदोलनं करायच्या. या वर्षीही जून महिन्यात बकरी ईदनिमित्त मंदिर बंद ठेवण्यात आल्यानंतर दुर्गाडी किल्ल्याबाहेर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले होते. आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशीही भूमिका घेतली होती.
बकरी ईदच्या दिवशी कल्याणच्या दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते.
९० च्या दशकात आनंद दिघेंनी याचा विरोध करत या ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरू केले होते. यावर्षीही या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक वाढल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येतो.