धाराशिव : प्रतिनिधी
कळंब शहरातील एका घरात महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे पुढे आले होते. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी ही महिला संबंधित होती असा दावाही करण्यात आला. या महिलेची ७-८ दिवसांपूर्वी हत्या झाली होती.
आता या प्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली आहे. उस्मान सय्यद आणि रामेश्वर भोसले या दोघांना कळंब पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी बीडच्या केजमधील रहिवासी आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी या महिलेचा वापर केला जाणार होता असाही काहींचा दावा आहे परंतु पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिला नाही.
याबाबत डीवायएसपी संजय पवार म्हणाले की, कळंब शहरातील एका घरात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात तपासाला सुरुवात केली. या मृत महिलेचे नाव मनीषा बिडवे असे आहे. डॉक्टरांच्या अहवालानंतर या महिलेचा डोक्यात धारदार शस्त्राने हल्ला करून खून झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचा पुरावा अद्याप सापडला नाही. त्यामुळे महिलेची हत्या आणि देशमुख हत्या प्रकरण कनेक्शन असल्याचे आता सांगू शकत नाही असे त्यांनी सांगितले.
मृतदेहासोबतच झोपला
तर रामेश्वर भोसले हा मृत महिलेकडे चालक म्हणून काम करत होता. या महिलेकडे रामेश्वरचे काही आक्षेपार्ह व्हीडीओ, फोटो होते. ही महिला छळ करत असल्याचे रामेश्वरने पोलिसांना सांगितले. या महिलेच्या हत्येनंतर आरोपी रामेश्वर भोसले मृतदेहाशेजारी २ दिवस झोपून होता. तिथेच जेवण करायचा. त्यानंतर तिस-या दिवशी मृतदेहाचा वास येऊ लागल्याने तो महिलेची कार घेऊन बाहेर पडला. त्याने केज येथील त्याच्या एका मित्राला महिलेच्या हत्येची माहिती दिली. मित्राला घेऊन मृतदेह ठेवलेल्या खोलीत गेला. तिथले काही पुरावे मिटवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र तो अयशस्वी ठरला असे तपासात पुढे आले.
दरम्यान, संतोष देशमुख हत्येनंतर त्याचा मृतदेह केजऐवजी कळंबला नेला जाणार होता. त्याठिकाणी कराड गँगने एक महिला तयार ठेवली होती. देशमुख यांचे या महिलेशी अनैतिक संबंध दाखवण्याचा बनाव करून त्यातून ही हत्या झाल्याची खोटी थिअरी तयार केली जाणार होती असा आरोप याआधी होत होता. याच घटनेतील ही महिला कळंबमध्ये मृत पावल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी करत बीड पोलिस अधीक्षकांकडे चौकशीची मागणी केली आहे.