सातारा : प्रतिनिधी
मराठी साहित्य संमेलनानिमित्त मुख्य मंडपात आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात अनेक नामवंत कवींनी आपल्या भावना शब्दांमधून प्रकट करत कवितांचे सादरीकरण केले. अध्यक्षस्थानी सातारा जिल्ह्यातील वाई येथील ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर होते.
तब्बल चार तास चाललेल्या या कविसंमेलनात महाराष्ट्रातील विविध भागातील कवींनी आपली प्रतिभा दर्शवित उत्तमोत्तम कविता सादर केल्या. कवी विठ्ठल वाघ, माजी आमदार कांता नलावडे, इंद्रजीत भालेराव, रयत शिक्षण संस्थेचे सचिव चंद्रकांत दळवी यांच्यासह असंख्य काव्यप्रेमींनी या कविसंमेलनाचा भरभरून आस्वाद घेत सादरीकरणाला दिलखुलास दाद दिली. प्रदीप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
‘मराठीची मुक्ताक्षरे आपण विसरत चाललोय’ या ओळींनी अशोक नायगावकर यांनी कविसंमेलनाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘‘तेव्हा ‘क’ कमळाचा होता. ‘थ’ खरा वाटायचा थुई थुई मोरासारखा नाचायचा.‘प’ परत ये परत ये म्हणत पारंबीवर राहायचा. ‘फ’ फावल्या वेळाचा होता अशी ही सगळी मुळाक्षरे बाराखडी
मोजत बसले आहेत’’, या काव्यपंक्ती ऐकविल्या.
‘माझ्या उलट्या कडीचे घर सादर होताना ..लोक भलेही लपवून ठेवू त्यात सोने आणि ताळेबंद मी खेळत्या वयात भाकरी लपवली उद्यासाठी..’ ही कविता सादर करताना छत्रपती संभाजीनगर येथील सुनील उबाळे यांनी जीवनाचे दर्शन घडवले. धाराशिव येथील कवी डी. के. शेख यांनी ‘तुझ्यामुळे गे, तुझ्यामुळे ..डोक्यावरचे केस गळाले..’ ही कविता सादर केली तेव्हा संपूर्ण मंडप हास्यरसात बुडाला.

