लातूर : प्रतिनिधी
येथील अभिजात फिल्म सोसायटी तर्फे कस्तुरी या सिनेमाच्या विशेष खेळाचे आयोजन दि. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६वाजता, श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या कस्तुर कंचन सभागृहात करण्यात आले आहे. सिनेमानंतर दिग्दर्शक विनोद कांबळे यांच्यासोबत परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
कनिष्ठ समजली जाणारी कामं करणा-या कुटुंबातल्या गोपी या मुलाची ही कथा आहे. आपल्या कपड्यांचा वास घालवू शकेल अशा कस्तुरीच्या शोधाची त्याची गोष्ट वास्तववादी पद्धतीने मांडली गेली आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट बालपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी प्रौढ प्रेक्षकांशी देखील तो तितक्याच सक्षमपणे संवाद साधू शकतो.
या खास स्क्रिनिंगसाठी सिनेमातले प्रमुख कलाकार समर्थ सोनवणे आणि श्रवण उपलकर यांचीही विशेष उपस्थिती राहणार असून प्रवेश विनामूल्य असणार आहे. अधिकाधिक लातूरकर सिनेरसिकांनी या सिनेमाचा लाभ घ्यावा असे आवाहन या निमित्ताने अभिजात फिल्म सोसायटीच्या कार्यकारीणीकडून करण्यात आले आहे.