पुणे : प्रतिनिधी
राज्यात महायुतीला अभूतपूर्व बहुमत मिळाले असले तरी ईव्हीएमविरोधात मोठे आंदोलन उभे राहत आहे. अनेक ठिकाणी पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी पैसे जमा केले आहेत. अनेक गावात मतदार आणि मतदानाची संख्या जुळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यातच पुण्यात ९५ वर्षीय समाजसेवक बाबा आढाव यांनी या सर्व प्रकाराविरोधात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले. या विधानसभा निवडणुकीत पैशांचा धुमाकूळ झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच ईव्हीएमवर त्यांनी संशय व्यक्त केला.
दरम्यान, शरद पवार यांच्यानंतर आज अजित पवार यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यावेळी बाबा आढाव यांनी आक्रमक पवित्रा घेत ईव्हीएमचे निराकरण झाले पाहिजे. आम्हाला दाबायचा प्रयत्न केल्यास माझ्यासारखी माणसे मरण पत्करतील, असा इशारा दिला.
ईव्हीएमच्या घोटाळ््यावर बाबा आढाव यांनी घाणाघात केला. आम्हाला हे स्वातंत्र्य असे मिळाले नाही. त्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. दोन तीन प्रश्न आहेत. त्याचे निराकरण करा. लोकसभा आणि विधानसभेतील मतदान आणि निकालात फरक कसा. याचा छडा लागला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही शत्रू नाही. आपण मित्रच आहोत. पण प्रश्नाचे निराकरण झाले पाहिजे. मी नमस्कार म्हणत नाही. जिंदाबाद म्हणतो. दादा तुम्ही आलात, मी दोनदा जिंदाबाद म्हणतो.
मला वाटते, काही प्रयत्न झाला नाही तर आम्ही हे आंदोलन शांततामय मार्गाने पुढे नेऊ. ते वाया जाऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. १९५२ पासून निवडणूका पाहिल्यात. मात्र यावेळी सरकारी यंत्रणाचा खूप वापर झाला. तुम्ही पवार आहात मी काय बोलणार. याचे निराकण झालं पाहिजे. हे दाबायचा प्रयत्न केला तर लोक बाहेर पडणार, असा इशारा त्यांनी दिला. मी कधी दगड हातात घेतला नाही, शिव्या दिल्या नाहीत, असेही ते म्हणाले.
प्रसंगी मरण पत्करेल
ईव्हीएममधील गैरप्रकार सिद्ध करण्याचे काम आपले आहे. घटनेला ७५ वर्षे होतायेत. मी आत्मक्लेश सुरू केला आहे. हे सरकार कुणालाच जुमानत नाही. मतपेटीत जे झाले, त्याचा छडा लागलाच पाहिजे. याचे निराकरण झाले पाहिजे. हे प्रकरण दाबायचा प्रयत्न केला तर आम्ही माघारी हटणार नाही. माझ्यासारखी माणसे प्रसंगी मरण पत्करतील, असा इशारा ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांनी दिला.