छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
सध्या महापालिका निवडणुकांच्या हालचाली सुरू आहेत. अशावेळी काँग्रेसमध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेत महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसने चांगले काम केले.
दरम्यान, राज्य काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाली आहे. आज त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. दरम्यान, ‘नवा भिडू, नवा राज’ याप्रमाणे स्थानिक कार्यकारिणीतही खांदेपालटाचे वारे वाहत असून, अनेक कार्यकर्त्यांनी यासाठी लॉबिंग सुरू केल्याची चर्चा आहे. बुलडाण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर आता कार्यकारिणी बदलाची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यभरासह छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यातही बदल होणार असल्याचे बोलले जात आहे. नव्याने शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष बदलले जाणार अशी चर्चा काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये केली जात आहे. त्यामुळे नव्याने शहराध्यक्षपदाच्या निवडीसाठी अनेकांच्या मनात पालवी फुटायला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये जरी काँग्रेसने मविआसोबत चांगली कामगिरी केली असली तरी विधानसभा निवडणूक काबीज करण्यात पक्षाला मोठे अपयश आले.
राज्यासह संभाजीनगर जिल्ह्यात पक्षाचा सुपडासाफ झाला. यामुळे येणा-या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नवे प्रदेशाध्यक्ष स्थानिक कार्यकारिणीत मोठे फेरबदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी त्यासाठी वरिष्ठांकडे लॉबिंगदेखील सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे.