28.1 C
Latur
Wednesday, November 26, 2025
Homeमहाराष्ट्रकाँग्रेस जिल्हाध्यक्षांचे अपहरण, मारहाण; राज्यात खळबळ

काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे अपहरण, मारहाण; राज्यात खळबळ

हिंदुत्ववादी संघटनेवर आरोप

अहिल्यानगर : प्रतिनिधी
अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे. अपहरण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. श्रीरामपूरमध्ये जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करण्यात आले. त्यांना मारहाणही झाल्याची माहिती मिळाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर अहिल्यानगर आणि श्रीरामपूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्यामुळे राज्यात चर्चेला उधाण आले आहे.

जिल्हाध्यक्ष सचिन गुजर हे नित्यनियमाप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे अपहरण करण्यात आले. सचिन गुजर यांचे अपहरण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. श्रीरामपूर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे. नेमके कोणत्या कारणामुळे त्यांचे अपहरण करण्यात आले, त्यांना का मारहाण करण्यात आली, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून काही जणांचे जबाब नोंदवले जात आहेत.

हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. आज सकाळी सात वाजता सचिन गुजर यांचे अपहरण करण्यात आले. त्यांना कारमध्ये बेदम मारहाणही करण्यात आली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. सचिन गुजर यांनी तात्काळ कार्यकर्त्यांसोबत श्रीरामपूर पोलिस स्टेशन गाठत गुन्हा नोंदविला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असतानाच मारहाणीची घटना घडल्यामुळे नगरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडूून जोरदार प्रचार केला जात आहे. सचिन गुजर यांनी काँग्रेससाठी अहिल्यानगर जिल्हा पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.

काँग्रेसचा तीव्र निषेध
ऐन निवडणुकीत विरोधकांवर हल्ले होत आहेत. राज्यात गृहखाते आणि पोलिस काय करत आहेत? वैचारिक मतभेद असू शकतात पण म्हणून विरोधकांना संपवण्याचा घाट घातला जात आहे. पोलिस काय करतात हा प्रश्न पण आता पडत नाही कारण ते निष्प्रभ ठरले आहेत. काँग्रेसने सचिन गुजर अपहरण प्रकरणाचा तीव्र निषेध करत, जोपर्यंत सर्व गुन्हेगारांना अटक होत नाही, तोपर्यंत निवडणुकीचा प्रचार बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

लोकांकडून ठोकशाही : सपकाळ
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, लोकशाही मान्य नसलेल्या लोकांकडून ठोकशाही चालवण्याचा हा प्रयत्न आहे. या घटनेपूर्वीही दोन नगरसेवक उमेदवारांना रात्री अटक करून त्यांना मारहाण करण्यात आली आणि मध्यरात्री पोलिसच त्यांना माजी खासदार सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण पाटील यांच्याकडे घेऊन गेले, जिथे त्यांना दमदाटी करण्यात आली, असे गंभीर आरोप सपकाळ यांनी केले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR