नाशिक : प्रतिनिधी
प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ हे प्रथमच नाशिकमध्ये येत आहेत. रविवारी ता. (६) रामनवमी असल्याने नाशिकच्या प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात भेट देऊन ते ‘जय श्री राम’ चा नारा देणार आहेत.
नाशिक शहरातील पंचवटी परिसरात काळाराम मंदिर आहे. अयोध्येतील श्री राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी स्वत : पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील काळाराम मंदिरात आले होते. त्यांनी काळाराम मंदिरात आरती करून स्वच्छता केली होती. त्यानंतर देशभरात हे मंदिर चर्चेत आले होते.
पंतप्रधान मोदी यांच्या दौ-यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या लोकार्पणाची धूम असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मात्र अयोध्येत न जाता काळाराम मंदिरात आले होते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापनदिनानिमित्ताने सहकुटुंब काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते.
नाशिक दौ-यावर आलेले महायुतीचे असोत की महाविकास आघाडीचे नेते ते श्री काळाराम मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेल्याशिवाय रहात नाहीत. आता काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील रामनवमीचा मुहूर्त साधत काळारामाचे दर्शन घेणार आहेत. दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव होणार असून सपकाळ यावेळी उपस्थित राहतील. त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे.
काळाराम मंदिर कायमच राजकीय नेत्यांच्या भेटीमुळे चर्चेत राहत असते.
सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षातील नेतेही या मंदिरात येत असतात. वनवासात असताना श्री प्रमुरामचंद्रांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या जागेवरच हे मंदिर उभारलेले असल्यामुळे त्यास विशेष महत्त्व व माहात्म्य प्राप्त झाले आहे.
दरम्यान प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सपकाळ हे प्रथमच नाशिकमध्ये येत आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता ते कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतील याकडे लक्ष लागून आहे.