सोलापूर : सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील अंदाजित पाच हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील कांदा खराब झाला. याशिवाय उत्पादनातही मोठी घट झाल्याची वस्तुस्थिती आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या आवक निम्म्याने कमी असताना आणि निर्यात सुरू असताना देखील कांद्याच्या दरात अपेक्षित सुधारणा झालेली नाही. अजूनही कांद्याला प्रतिक्विंटल दर तीन हजार रुपयांच्या आतच असल्याचे चित्र सोलापूर बाजार समितीत पाहायला मिळत आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूरसह नाशिक, धाराशिव, पुणे, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक (विजयपूर, कलबुर्गी)येथूनही कांदा विक्रीसाठी येत आहे. पण, सोलापूर जिल्ह्यातील बंगळूर बाजारात मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी नेला जात आहे. त्या ठिकाणी पाच ते साडेसहा हजारांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळाल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत. परंतु, सर्वांनाच त्या ठिकाणी कांदा नेण्याचे भाडे परवडत नसल्याने अनेकजण सोलापूर बाजार समितीत कांदा घेऊन येत आहेत.
आवक कमी होत असल्याने आणि परदेशात कांदा निर्यातही सुरू असल्याने या आठवड्यात, महिन्यात भाव वाढेल, ही शेतकऱ्यांची आशा फोल ठरत असल्याची स्थिती आहे. साडेचारशे, पाचशे ट्रक कांदा बाजार समितीत आला तरीदेखील सरासरी भाव २६०० ते २८०० पर्यंतच आणि आवक साडेतीनशे ट्रक असली तरी भाव तेवढाच, असे चित्र पाहायला मिळत आहे. कांद्याला प्रतिक्विंटल किमान ३५०० रुपयांपर्यंत सरासरी भाव मिळावा म्हणजेच सहा हजार रुपये प्रतिक्विंटल कांदा विकला जावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे; जेणेकरून मशागतीसह अन्य खर्च निघून चार पैसे हाती राहतील, अशी आशा आहे.
पूर्वानुभव पाहता शेतकऱ्यांना यंदाही निर्यातबंदीची धास्ती कायम आहे. सध्या अनेक शेतकरी ओला कांदा (पूर्ण वाढ होण्यापूर्वीच) काढून बाजारात आणत असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे. ओला कांदा असल्याचे कारण दिले जात असल्याने त्यांना चांगला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी घाई करू नये, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे. तर शेतकऱ्यांना निर्यातबंदी होणार नसल्याचा विश्वास केंद्रीय स्तरावरून अपेक्षित आहे, पण तसे होताना दिसत नाही.