नाशिक : प्रतिनिधी
गृहिणींचे बजेट बिघडण्याची चिन्हे आहेत. स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक असलेला कांदा आता महागला आहे. कांद्याच्या दरात वाढ झाली असून कांदा थेट शंभरीच्या उंबरठ्यावर आला आहे. या आठवड्यात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातून कांद्याचे प्रमाण कमी होण्याची चिन्हे आहेत. तसेच, कांदाभजी, मिसळपाव यासारखे चटपटीत पदार्थ महागण्याची शक्यता आहे.
कांदा गेल्या आठवड्यात ७० ते ८० रुपयांपर्यंत होता. मात्र, आता कांद्याचे दर ८० ते १०० रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे. दरवाढीमुळे कांद्याच्या खरेदी-विक्रीवरही परिणाम होऊ शकतो. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कांद्याचे नुकसान झाल्याने नवीन कांदा जवळपास संपला आहे. शेतक-यांकडील उन्हाळी कांदा संपण्यास सुरुवात झाल्यानंतर कांद्याचे दर वाढले आहेत. शेतक-यांना साठवणूक केलेल्या कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने नाराजी आहे तर दुसरीकडे कांदा ८० ते १०० रुपये किलो महागल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे.
सप्टेंबरनंतर जुना कांदा संपू लागल्याने कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तसेच, सतत ढगाळ वातावरण आणि हवेतील आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे खरीप कांद्याचे (पोळ) यंदा उत्पादन कमी झाले आहे. दुसरीकडे तण काढण्यासाठी लागणा-या तणनाशकांवर शेतक-यांना मोठा खर्च करावा लागत आहे.
कृषिमंत्र्यांनी सांगितले कारण
सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवल्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आले आहे, त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत, असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान यांनी म्हटले आहे.